मालिकांमधील व्यक्तीरेखांची, मालिकेच्या कुटुंबातील सदस्यांची केमिस्ट्री हा त्या मालिकेचा महत्वाचा भाग असतो. पण अनेकदा असं होतं की मालिकेच्या निमित्ताने कलाकार पहिल्यांदाच भेटत असतात. त्यापूर्वी त्यांनी कधीच एकत्र काम केलेलं नसतं. कधी पहिल्या भेटीत स्वभाव आवडत नाही किंवा मतं जुळत नाहीत. त्यात समोरचा कलाकार ज्येष्ठ किंवा अनुभवी असेल तर मग नव्या कलाकारांना दडपण येऊ शकतं. पण एकदा का मालिका रंगायला सुरूवात झाली की कलाकारांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री जुळतेच पण ऑफस्क्रिनही त्यांची भट्टी जमते. असे अनुभव कलाकार नेहमीच त्यांच्या सोशलमीडियावर शेअर करत असतात. आताही असाच भावुक अनुभव शेअर केला आहे मन उडू उडू झालं या मालिकेतील कार्तिकची भूमिका करणाऱ्या ऋतुराज फडके याने. या मालिकेतील एक खडूस वाटणारी मुलगी त्याला इतकी आवडलीय की तिच्यापासून दुरावणार या विचारानेच तो दु:खी झालाय.

मन उडू उडू झालं ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील एकेक सीनचं शूटिंग शेवटचं ठरत आहे. मालिकेतील बँकेमधले सीन संपले. दीपू आणि इंद्राच्या घरातील सीनचंही पॅकअप झालं. आता दीपू आणि इंद्रा यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. यानंतर १३ ऑगस्टला मालिकेचा शेवटचा एपिसोड रिलीज होणार आहे. प्रेक्षकांच्या भेटीला जरी ही मालिका अजून महिनाभर येणार असली तरी कलाकारांसाठी शूटिंग संपत चाललय. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील सर्वच कलाकार त्यांच्या सोशल मीडियापेजवर त्यांच्या आठवणी, फोटो, व्हिडिओ शेअर करत आहेत. या मालिकेतील कार्तिक साळगावकर ही खलनायकाची भूमिका करणारा ऋतुराज फडके हा सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असतो. मालिका सुरू असतानाही तो सेटवरचे धमाल किस्से व्हिडिओतून शेअर करायचा. या मालिकेत त्याच्या आईच्या भूमिकेत पौर्णिमा तळवलकर होती. ऋतुराजने पौर्णिमासोबतचा फोटो शेअर करत तिचं आणि त्याचं मालिकेच्या निमित्ताने जुळलेलं नातं चाहत्यांशी शेअर केलं आहे. फोटोसोबत ऋतुराजने असं लिहिलं आहे की, सेटवरची ही सर्वात गोड मुलगी. तिची होणार सून मी या घरची मालिका मी पहायचो. पण तेव्हापासून मला ती खडूस वाटायची. एका दुसऱ्या मालिकेच्या सेटवर पौर्णिमाताईची ओझरती भेट झाली होती पण बोलणं झालं नव्हतं. मन उडू उडू झालं या मालिकेत ती माझी आई होणार हे कळल्यावरही मला तिची भीती वाटली होती. पहिल्या दिवशी मी घाबरलोच होतो, पण तिने एक दोन तासातच माझी भीती पळवून लावली.

आम्हा नव्या कलाकारांसोबत छान जमवून घेतलं, फोटो, व्हिडिओ काढण्यात सामील झाली. सध्या तर ती सोशल मीडियावर रिल करत असते. एकवेळ अशी होती की मला ती खडूस वाटायची आणि या मालिकेच्या निमित्ताने मला तिची इतकी सवय झाली की ती नसेल तर मला करमायचं नाही. पौर्णिमा ताई मला माझी खरीच आई वाटते. ती रोज सेटवर सगळ्यांसाठी डबा आणते. ती कधीच चिडत नाही. तिचा हसतमुख चेहरा पाहिला की माझा सगळा कंटाळा जातो. खरंतर मालिकेत मी तिचा नावडता मुलगा आहे, पण सेटवर मी तिचा आवडता असून अगदी माझ्या आईसारखीच ती माझी काळजी घेते. मन उडू उडू झालं ही मालिका संपणार हे कळल्यापासून इंद्रा म्हणजे अजिंक्य राऊतनेही अनेक भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत. नुकतीच या मालिकेतील कलाकारांनी सेंड ऑफ पार्टीही केली. मालिका संपली तरी मैत्री, नाती कायम ठेवू अशा भावना व्यक्त केल्या. पण यामध्ये खडूस वाटणारी मुलीला सर्वात गोड मुलगी म्हणणाऱ्या ऋतुराजने पौर्णिमा तळवलकरसोबत शेअर केलेला फोटो सध्या चर्चेत आहे.