मराठी सृष्टीतील प्रयोगशील दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता अशी ओळख प्रवीण तरडे यांनी मिळवली आहे. देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव, मुळशी पॅटर्न अशा दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करून प्रवीण तरडे यांनी स्वतःचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शाळेत, कॉलेजमध्ये असताना नाटकाच्या वेडाने प्रवीण तरडे यांना अगदी झपाटून सोडले होते. एक उत्कृष्ट लेखक, अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे प्रसिद्ध असले तरी दाक्षिणात्य दिग्दर्शक राजा मौली यांचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो. प्रवीण तरडे हा हा फक्त फॅन्स नाही तर तो राजा मौली यांच्यासाठी मी ‘एकलव्य’ आहे असे म्हणून प्रवीण स्वतःला त्यांचे शिष्य मानतात.

एवढेच नाही प्रवीण तरडे यांनी आपल्या ऑफिसमध्ये चक्क राजा मौली यांचा भलामोठा फोटो फ्रेम करून लावला आहे. याचे कारण त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ‘मी त्यांचा एकलव्य आहे’ असे म्हणत प्रवीण तरडे राजा मौली यांना गुरू मानतात. ‘ माझ्या ऑफिसमध्ये जर तुम्ही एन्ट्री केली तर समोर भिंतीवर तुम्हाला राजा मौली यांचा भलामोठा फोटो तुम्हाला दिसेल. गेल्या सात वर्षांपासून तो फोटो तिथं आहे. मी ऑफिसवर गेल्यावर पहिल्यांदा त्यांच्या फोटोकडे पाहतो का तर या माणसाने जसे त्याचे स्थानिक चित्रपट जगभर पोहोचवले त्यांच्या चित्रपटांची जगाने दखल घेतली त्याचा प्रभाव माझ्यावर पडला आहे. त्यामुळे माझ्या चित्रपटांची दखल जगाने घ्यावी असे चित्रपट मी बनवावे असं मला वाटतं. मी त्यांना भेटलो तेव्हा मी खूप भावुक झालो. त्यावेळी ते त्यांच्या भाषेत बोलत होते मी सुद्धा माझ्या भाषेत बोलत होतो. ते त्यांची भाषा सोडून बोलत नाहीत म्हणून मी पण मुद्दामहून मराठी भाषेतूनच बोललो . प्रभासने सुद्धा माझ्या चित्रपटाचा टिझर शेअर केला होता. मुळशी पॅटर्न चित्रपटामुळे मला बॉलिवूड, टॉलिवूड क्षेत्रात ओळख मिळाली. त्यामुळे मी मुळशी पॅटर्न चित्रपट बनवला होता हे त्याला माहित होते पण माझ्या चित्रपटाचा टिझर त्याला आवडला म्हणून त्याने तो शेअर करताना माझं कौतुक केलं होतं.

मला एक अभिनेता म्हणून साऊथमध्ये अनेकजण बोलावतात. पण अभिनयापेक्षा मला लेखन दिग्दर्शन करायचं आहे.मी विजया मेहता यांना असिस्ट करायचो, सत्यदेव दुबे यांच्या हाताखाली मी वाढलो. भारतातील अशी कुठलीही रंगभूमी नाही ज्यावर मी प्रयोग नाही केला. मला जास्त करून नाटकाची आवड आहे पण चित्रपट हे माध्यम प्रभावी असल्याने मी या क्षेत्राकडे वळलो.’ लवकरच प्रवीण तरडे देऊळ बंद २ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या समोर घेऊन येत आहेत. देऊळ बंद च्या यशानंतर त्यांनी या चित्रपटाचा पुढचा भाग काढण्याचे ठरवले. त्यामुळे या चित्रपटात प्रेक्षकांना वेगळं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे. अर्थात स्वामींवर निस्सीम श्रद्धा आणि भक्ती असलेल्या प्रवीणच्या या चित्रपटात पुन्हा एकदा त्यांची महती अनुभवायला मिळणार आहे एवढे मात्र नक्की. प्रेक्षक देखील “देऊळ बंद २” चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत कारण देऊळ बंद चा पहिला भाग अनेकांच्या मनात घर करून गेला होता.