१९ जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा होतोय. आपल्या वडिलांसाठी अनेकजण भावना व्यक्त करत आहेत. वडील आणि मुलांचा हा खास दिवस असूनही मंजिरी ओक हिने पती प्रसाद ओक याला फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रमुखी सिनेमातील लावणीतील ओळी शेअर करत मंजिरीने ही पोस्ट शेअर केली आहे. पत्नीकडून पतीला फादर्स डे शुभेच्छा का दिल्या असतील याचंही कारण तिने पोस्टमध्ये सांगितलं आहे. आज फादर्स डेनिमित्ताने सेलिब्रिटी कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या मुलांचे आणि बाबांचे फोटो शेअर केले आहेत. अशाच फादर्स डेच्या पोस्टमध्ये एक पोस्ट मात्र लक्षवेधी ठरली आहे.

इथे मुलांनी त्यांच्या बाबाला शुभेच्छा दिल्या नसून बायकोनेच हॅपी फादर्स डे असं म्हटलं आहे. तो कलाकार आहे अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक आणि त्याला पत्नी मंजिरीने फादर्स डेच्या शुभेच्छा देत त्यामागचं कारणंही सांगितलं आहे. ती या पोस्टमध्ये असं लिहितेय की, आमच्या घरातील तीन मुलं म्हणजे मयंक आणि सार्थक ही आमची मुलं अन् मस्कारा हा आमचा कुत्रा यांची प्रसाद खूप काळजी घेतो. मयंक आणि सार्थक यांच्या जडणघडणीत प्रसादने बाबा म्हणून जे केलय त्याची मी साक्षीदार आहे. प्रसाद कितीही बिझी असला तरी त्याने मुलांना प्राधान्य दिलंय. कधी कधी आई म्हणून् माझ्यापेक्षा जास्त प्रसादने त्यांना घडवण्यात वाटा दिलाय. मुलांना तो खूप छान समजून घेतो. प्रसाद नवरा म्हणून तर बेस्ट आहेच पण वडील म्हणून तो ग्रेट आहे.मंजिरीने या पोस्टमध्ये प्रसादच्या आयुष्यातील एक स्पेशल गाणंही जोडलं आहे. मंजिरीने तिच्या इन्स्टापेजवर प्रसाद आणि मुलांसह मस्कारा या कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. हॅपी फादर्स डे अशी ओळ आणि जोडीला चंद्रमुखी सिनेमातील सवाल जवाब लावणीतील, उमगायाला सोपी आई, बाप कुणाला कळतो गं या ओळींतून मंजिरीने प्रसादमधील बाबाचं वर्णन केलं आहे.

मंजिरीने नवऱ्यासाठी केलेली ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. प्रसादचा अभिनय असलेला धर्मवीर आणि दिग्दर्शन असलेला चंद्रमुखी हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफीसवर गाजत आहे. या दोन्ही सिनेमासाठी प्रसादने कष्ट घेतल्याचंही मंजिरीनं सांगितलं. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक ही जोडी मराठी मनोरंजन विश्वात चर्चेत असते. सेलिब्रिटी कलाकारांच्या जोड्यांमध्ये ही जोडी चाहत्यांशी सोशल मीडियादवारे कनेक्ट असते. प्रसाद आणि मंजिरी मिळून अनेक व्हिडिओ व रिल्स सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. एकमेकांचे वाढदिवस, दिवाळी पाडवा, वटपौर्णिमा अशा निमित्ताने प्रसाद आणि मंजिरी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. पण आता फादर्सडे ला मंजिरीने प्रसादसाठी खास पोस्ट लिहून वेगळेपण जपलं आहे.