९ ऑगस्ट २०२२ रोजी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गिरगाव येथील राहत्या घरी निधन झाले होते. खरं तर त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी मनाला चटका लावून जाणारी ठरली होती. तमाम चाहत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता गिरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्यावेळी विजय पाटकर, जयवंत वाडकर यांनीही हजेरी लावत मीडियाशी संवाद साधून आपल्या मित्राच्या ४० वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला होता. प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून प्रदीप पटवर्धन यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन भावुक झाला आहे. आमच्या दुःखद प्रसंगात धीर देणाऱ्या, सांत्वन करणाऱ्या सर्वांचेच आम्ही ऋणी आहोत असे तो भावनिक होऊन म्हणतो आहे.

याबाबत सविस्तर लिहिताना श्रीतेज पटवर्धन म्हणतो की, ‘कळण्यास अत्यंत दुःख होत आहे की, दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ च्या सुमारास माझे वडील कै. प्रदीप शांताराम पटवर्धन यांचे आमच्या झावबावाडी, गिरगाव येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर त्याचदिवशी दुपारी ३ वाजता चंदनवाडी, गिरगाव येथील स्मशानभूमीत शास्त्रशुद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्व विधी त्यांचा एलूलता एक मुलगा ह्या नात्याने उपस्थित कुटुंबियांच्या समवेत पार पाडले. माझ्या वडिलांचे हे असे अचानक जाणे सगळ्यांसाठीच धक्कादायक होते. वयाच्या ६५ व्या वर्षी सुद्धा ते अत्यंत सक्रिय होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. अगदी आधल्या दिवशी सुध्दा ते एका नाट्य स्पर्धेचे परीक्षक होते. आमच्यावर कोसळलेल्या ह्या दुःखद प्रसंगात, आम्हाला धीर देणाऱ्या, सांत्वन करणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या उपस्थित राहणाऱ्या सर्वांचेच आम्ही मुलगा श्रीतेज पटवर्धन, माझी पत्नी सौ निकिता पटवर्धन, माझी आई श्रीमती सुवर्णहेरा जाधव आणि माझे काका श्री सुधीर शांताराम पटवर्धन ऋणी आहोत. माझ्या वडिलांचे, त्यांचं कार्यक्षेत्र आणि अभिनय यावर निस्सीम प्रेम होतं.

त्यांनी कायमच रंगभूमीची सेवा मनोभावे केली. त्यांचे हेच विचार आम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतील याची मला खात्री आहे कारण, ‘द शो मस्ट गो ऑन’!. प्रदीप पटवर्धन यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे. रामणारायन रुईया कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतले आहे. तर प्रदीप पटवर्धन यांच्या पत्नी सुवर्णरेहा जाधव या लेखिका आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रावरून त्यांचे लेख प्रसिद्ध केले जातात. सुवर्णाहेरा यांनी देखील प्रदीप पटवर्धन यांच्या आठवणीत एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘९ ऑगस्ट २०२२ रोजी माझा मुलगा श्रीतेजचे वडील आणि माझे ex husband प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाल्याची घोषणा करत असताना माझे हृदय अतिशय दु:खाने भरले आहे. प्रदीप चांगले वडील आणि चांगले मित्र होते. एक यशस्वी आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून त्याने केवळ थिएटर आणि चित्रपट विश्वातच नव्हे तर आपल्या प्रियजनांच्या हृदयातही ठसा उमटवला. तो खूप लवकर आपल्यापासून दूर गेला आणि तो कायमचा आठवणीत राहील.