
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न संपन्न झाले आहे. मालिकेचे प्रेक्षक या क्षणाची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर रविवारच्या विशेष भागात त्यांचा हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. नेहा आणि यशच्या लग्नात एका पात्राची एन्ट्री झाली होती हे पात्र म्हणजेच नेहाचा पहिला नवरा असावा असा अंदाज बांधण्यात आला होता. नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्यात हे पात्र विघ्न तर आणणार नाही ना अशी पुसटशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र हे लग्न सुखरूप पार पडलेले पाहायला मिळाले. मालिकेत यश आणि नेहाचा संसार खुलू लागला आहे आता अशातच तिच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री होणार आहे. हे पात्र साकारणारा अभिनेता कोण असेल? याचा विचार प्रेक्षकांनी देखील यापूर्वी केला होता.

कारण प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे सारखे गुणी कलाकार या मालिकेला लाभले आहेत. त्यामुळे हे पात्र देखील तितक्याच दमदार अभिनेत्याला देण्यात यावे असा विचार केला जाऊ लागला होता. या पात्रासाठी एका योग्य अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे आणि हे पात्र लवकरच मालिकेत दाखल होताना दिसणार आहे. मालिकेत नेहाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे ‘ निखिल राजेशिर्के’. निखिल राजेशिर्के याने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमधून , नाटकांमधून तसेच चित्रपटांमधुन महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत देखील त्याची तितकीच दमदार भूमिका असणार आहे. ८ दोन ७५ हा त्याचा अभिनित केलेला आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निखिल राजेशिर्केला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. रुईया कॉलेजमध्ये असताना त्याने नाट्यस्पर्धा, एकांकिका मधून सहभाग दर्शवला होता. यातूनच त्याला मालिकांमधून झळकण्याची संधी मिळाली. छोटी मालकीण,लगोरी, प्रीती परी तुजवरी, अजूनही बरसात आहे, असेही एकदा व्हावे, बाईकर्स अड्डा, फोर इडियट्स, स्ट्रॉबेरी अशा मालिका चित्रपट तसेच नाटकांमधून त्याला महत्वपूर्ण भूमिका मिळत गेल्या.

मुव्हिंग आउट या वेबसिरीजला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. अभिज्ञा भावे सोबत त्याची या वेबसिरीजमध्ये चांगले बॉंडिंग जुलू आले होते. माझी तुझी रेशीमगाठ आणि अजूनही बरसात आहे या मालिकेतील त्याच्या भूमिका काहीशा विरोधी ढंगाच्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. अजूनही बरसात आहे या मालिकेत तो मिराचा मित्र निखिलच्या भूमिकेत दिसला होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतही तो अशाच धाटणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता सिम्मी काकूंना देखील नेहाचा भूतकाळ ठाऊक आहे. त्यामुळे सिम्मी काकू आणि नेहाचा पहिला नवरा हे दोघे मिळून नेहाला त्रास देताना दिसणार आहेत. नेहा आणि यशच्या सुखी संसारात तिच्या पहिल्या नवऱ्याच्या एंट्रीने वादळ उठणार आहे. त्यामुळे मालिकेचे येणारे पुढील भाग अनेक धक्कादायक ट्विस्ट देणारे ठरणार आहेत.