माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये परी यशची परीक्षा घेताना दिसत आहे. मी अजून होकार दिला नाही असे परी म्हणताच तिला मनवण्यासाठी यश शक्य ते प्रयत्न करत आहे. परीच्या आगळ्यावेगळ्या प्रश्नांना उत्तरं देताना यशची मात्र पुरती दमछाक होणार आहे हे नक्की. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग २० मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत मालिकेप्रति प्रेक्षकांचे प्रेम पाहून पहिल्यांदाच या मालिकेचा रविवार विशेष भाग प्रसारित केला जात आहे त्यामुळे या विशेष भागाची आतुरता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

मालिका सुरू होण्या आधी जो प्रोमो दाखवला होता त्या प्रोमोमध्ये परी एका हॉटेलमध्ये बसून यशला प्रश्न विचारत असते. काय काम करतोस? कमवतोस किती? आईला गाणं आवडतं की डान्स? मला जर एक घरात प्राणी हवा असेल तर तू कोणता आणशील? अशा प्रश्नांचा भडिमार करत रविवारचा विशेष भाग रंगलेला पाहायला मिळणार आहे. एकीकडे यश परीला तिच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना दुसरीकडे मात्र मालिकेत एक मोठा बदल घडून आलेला पाहायला मिळणार आहे. मालिकेत यशचे आजोबा म्हणजेच जगन्नाथ चौधरी ही भूमिका साकारणारे अभिनेते मोहन जोशी यांची या मालिकेतून एक्झिट झाली असून हे पात्र आता ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर साकारणार आहेत. मालिकेत झालेला हा बदल प्रेक्षकांना हवाहवासा नसला तरी प्रदीप वेलणकर हे कसलेले कलाकार असल्याने त्यांना आजोबांच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल. मोहन जोशी यांनी साकारलेले आजोबा मालिकेतून बराच काळ बाहेर होते. बहुतेक दुसऱ्या कोणत्या प्रोजेक्टमधून वेळ मिळत नसल्या कारणाने त्यांनी ही मालिका सोडली असावी असे बोलले जात आहे.

मात्र मोहन जोशी यांनी आपल्या अभिनयाने रंगवलेले आजोबा प्रेक्षकांच्या मनात घर करून होते. त्यांनी मालिका सोडणे प्रेक्षकांना मुळीच रुचणार नाही. मात्र प्रदीप वेलणकर यांच्यासाठी ही भूमिका तितकीच आव्हानात्मक असणार हे वेगळे सांगायला नको. प्रेक्षक ज्या कलाकाराला आजवर त्या भूमिकेत पाहत होते त्या कलाकाराच्या जागी अचानकपणे दुसरा कोणता कलाकार आल्यास प्रेक्षकांना त्यांना स्वीकारणे थोडेसे कठीण असते नेमके असेच प्रदीप वेलणकर यांच्या बाबत घडलेले पाहायला मिळणार आहे. मात्र प्रदीप वेलणकर जगन्नाथ चौधरीची भूमिका तितक्याच सहजतेने प्रेक्षकांच्या मनात उतरवतील हा विश्वास आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये सिम्मी काकू आजोबांची गोळी बदलते. यामुळे जगन्नाथ आजोबांच्या स्वास्थ्यावर परिणाम तर होणार नाही ना हे रविवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी प्रदीप वेलणकर यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!…