बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये कुणी कुणाला दगड म्हणतं तर कुणी कुणाला टॉनिक म्हणतं. पण आठवड्याच्या शेवटी भरणाऱ्या चावडीवर कुणाची शाळा होणार याकडे लक्ष लागलेलं असतं. रविवारच्या चावडीवर महेश मांजरेकर हे किरण मानेला माकड म्हणाले. आता हे माकड कुणाच्या तालावर नाचतय त्याचाही गौप्यस्फोट झाला. बिग बॉस मराठी या शोमध्ये आठवडाभर काय चालतं यापेक्षाही आठवड्याच्या शेवटी चावडीवर कुणाची शाळा रंगते याकडे प्रेक्षकांचे डोळे लागलेले असतात. महेश मांजरेकर याच चावडीवर आठवडाभराचा हिशोब मांडतात. सदस्यांना त्यांच्या वागण्याचा जाब विचारला जातो. त्यामुळेच रविवारचा एपिसोड तुंबडतोड असतो. अर्थात या भागात चांगलं वागणाऱ्या सदस्याचं कौतुकही होतं, पण तरीही मांजरेकर कुणाला खडे बोल सुनावणार हा या शोचा यूएसपी असतो.

यावेळच्या वीकेंडला किरण मानेवर बोट ठेवत मांजरेकर यांनी त्याला माकड बनवलं आणि तेही राखी सावंतचं. काय आहे नेमकं प्रकरण? बिग बॉसचा नवा प्रोमो सोशलमीडियावर रिलीज झाला आहे. यामध्ये मांजरेकर असं म्ह्णत आहेत की, राखी आल्यापासून तिने धुमाकूळ घातला आहे. राखीचा एकही शब्द कुणी खाली पडू देत नाहीय. खरंतर या घरात आधीपासून जे स्पर्धक आहेत तेही राखीचे गुलाम झाल्याप्रमाणे वागत आहेत. एक अमृता देशमुख मात्र राखीचं काही ऐकत नाही, बाकी इतरांनी नांगी टाकली आहे. बिग बॉसच्या घरातून काही स्पर्धकांना नारळ दिला तर नव्याने चार सदस्य चॅलेंजर्स म्हणून दाखल झाले आहेत. यामध्ये यापूर्वी बिग बॉसच्या खेळाचा अनुभव घेतलेल्या राखी सावंत, विशाल निकम, मीरा जगन्नाथ आणि आरोह वेलणकर यांची एन्ट्री झाली आहे. आता या सदस्यांमध्ये राखी सावंत असेल तर धमाका तर होणारच ना भाऊ. राखी रोज एक फटाका फोडत असते. विशाल निकम तिला चांगलीच टक्कर देतोय, पण राखीने आल्यापासून मनोरंजनाचे फवारे उडवायला सुरूवात केली आहे. राखीच्या मागेपुढे करण्यात चक्क किरण माने हा जास्तच आहे असं दिसून येतंय. एरव्ही कुणालाही हवा न देणारा किरण राखी राणीच्या तालावर नाचतोय असं म्हणतच चावडीवर मांजरेकर यांनी किरणला पट्ट्यात घेतलं.

किरण माने हा तर राखीच्या हातचं माकड बनला आहे. तिच्या मागे पुढे करण्यातच त्याचा दिवस जातोय. यावर राखी म्हणतेय की, बिलनची नागीण निघाली, नागोबा डोलायला लागला. यावर गप्पं बसतील ते मांजरेकर कसले, त्यांनी लगेच पुष्टी जोडली आणि म्हणाले, डोलायला आणि लोळायलाही लागला आहे. यावर चावडीवर हशा तर पिकलाच पण एरव्ही कुणी काही बोलले तर अरेला कारे करणारा किरण मानेही त्याची ही खरडपट्टी हसण्यावारी नेतोय. अभिनेता किरण माने आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हे बिगबॉस मराठी च्या घरातील सर्वात उत्तम खेळाडू आहेत पण गेल्या आठवड्यात तेजस्विनी लोणारी हिला हाताच्या दुखापतीमुळे बिगबॉसच्या घरातून बाहेर पाडाव लागलं. पण प्रेक्षक मात्र बिगबॉसच्या ह्या डिसीजनवर नाराज असून तेजस्विनी लोणारी हीच बिगबॉसची प्रमुख दावेदार असून तिच्याशिवाय बिगबॉस पाहायला मजा येत नाही असं व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे तेजस्विनी बारी होऊन पुन्हा घरात दाखल होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.