चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा ‘ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हा राष्ट्रीय महिला आयोगाने या चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप नोंदवला होता. चित्रपटातले बोल्ड आणि आक्षेपार्ह सीन काढून टाकण्याची त्यांनी मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी प्रसारण मंत्रालयाला पत्र देखील पाठवले होते. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी तो ट्रेलर हटवला होता. अडचणींना मागे सारून चित्रपट १४ जानेवारीला रिलीज करण्यात आला.

चित्रपटाबद्दल समीक्षकांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या त्यातून महेश मांजरेकर यांनी आपल्या चित्रपटातून वास्तवाची जाणीव करून दिली असेही म्हटले जात होते. तर अनेकांनी आक्षेपार्ह दृश्यांवर नाराजी दर्शवली होती. नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा हा चित्रपट १४ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात छाया कदम, उमेश जगताप, शशांक शेंडे, गणेश यादव, रोहित हळदीकर, ईशा दिवेकर, अमित भानुशाली, अश्विनी कुलकर्णी, वरद नागवेकर, प्रेम धर्माधिकारी, कश्मिरा शाह, सविता मालपेकर असे बरेचसे कलाकार झळकले आहेत. हा चित्रपट खाण कामगारांच्या जीवणावर भाष्य करणारा आहे. मात्र या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये महिलांना आणि लहान मुलांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आले आहे. याशिवाय अश्लील भाषा आणि अश्लील दृश्ये देखील दाखवण्यात आली असल्याने खाण कामगारांच्या बाबतीत चुकीच्या पध्दतीने चित्रपटातून दाखवले जात आहे. त्यामुळे या चित्रपटातून समाजमाध्यमात चुकीचा संदेश देण्यात येत असल्याचे क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने म्हटले आहे.

त्यावर आता क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने महेश मांजरेकर,निर्माते नरेंद्र हिरावत आणि श्रेयन्स हिरावत तसेच एन एच स्टुडिओ विरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये आणि अश्लील भाषा यांचा विचार करून त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वकील डी वी सरोज यांनी केली आहे. त्यामुळे नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा या चित्रपटामुळे महेश मांजरेकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. महेश मांजरेकर यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. ‘पांघरूण’ हा त्यांचा आगामी चित्रपट विधवापुनर्विवाहवर भाष्य करणारा आहे. अर्थात वास्तवाशी निगडित असलेल्या काकस्पर्श, या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी त्याच धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्यासमोर आणण्याचे धाडस केले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.