व्हॅलेंटाइन डे ला कुणी तरूण मुलगा एकटाच बसला असेल तर त्याची खिल्ली उडवण्याची एकही संधी त्याचे मित्र सोडत नाहीत. आयुष्यात एक गर्लफ्रेंड मिळवता आली नाही तुला असं म्हणत त्याला वैतागून सोडतात. अर्थात यातही एक गंमत असते. एक गर्लफ्रेंड असावी, तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करता याव्यात असं कुणाला वाटत नाही. तिच्यासोबत अख्खी रात्र प्रेमाच्या गुजगोष्टी करण्यात संपावी असं वाटले तर काय चुकीचे आहे. पण त्या गर्लफ्रेंडची जागा जर रात्रभर घोरणारया मित्राने घेतली तर काय अवस्था होईल ना…. कॉमेडी किंग कुशल बद्रिके याच्या आयुष्यातील गर्लफ्रेंडची जागा अशीच कुणीतरी हिरावून घेतली आहे कुशलने ही गोष्ट सोशलमीडियावर पोस्ट केली. कुशलच्या बेडवर शेजारी झोपून घोरणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून विनोदवीर भाऊ कदम आहे. भाऊच्या वाढदिवशीच कुशलने त्यांचे हे बेडरूम सिक्रेट ओपन करत भाऊच्या घोरण्यावरून घनघोर शुभेच्छा अशी कॅप्शन दिली आहे.

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचे विनोदाचे पंच चला हवा येऊ दय़ा या शोच्या मंचावर नेहमीच हास्याचे फवारे उडवत असतात. गेली दहा वर्षे भाऊ आणि कुशल या दोघांना एकमेकांची इतकी सवय झाली आहे हे त्यांच्यातील केमिस्ट्रीवरून कायमच दिसते. एका शूटिंगच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात कुशल आणि भाऊ यांनी एक रूम शेअर केली. आज भाऊचा वाढदिवस असल्याने ही जोडगोळी आनंदातच होती. शूटिंगमुळे दमलेल्या भाऊने कुशलच्या बेडवरच स्वत:ला झोकून दिले आणि भाऊ डाराडूर झाला. पण ती अख्खी रात्र कुशलने जागून काढली. सुंदर प्रेयसी कशी आपली झोप उडवते तशी या प्रेयसीने माझी झोप उडवली आहे असं म्हणत कुशलने घडलेला प्रसंग इन्स्टा पेजवर भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शेअर केला. माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा घेणारा हा एकमेव माणूस असं म्हणत एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. मै जागू तू सो जाए या गाण्याच्या ओळीही कुशलने प्ले केल्या आहेत. पडदय़ावर तर ही जोडी त्यांच्या विनोदी शैलीने हसवून बेजार करतच असते पण ऑफस्क्रिनही त्यांची विनोदबुध्दी किती तल्लख आहे हे कुशलने या गमतीशीर व्हिडिओपोस्टमधून दाखवून दिले आहे. कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कलाकारांनी हटके प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने असं म्हटले आहे की कुशल तू या प्रेयसीला भाऊ म्हणतोस हे पाहून मजा वाटली. तर एका चाहत्याने अशी कमेंट केली आहे की तुम्ही दोघांनी मिळून हसवून हसवून सगळय़ा जगाची झोप उडवली आहे.

कुशल आणि भाऊ यांच्यात खूप छान मैत्री आहे. खूप संघर्ष करून हे दोघेही यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचले आहेत. दादा कोेडके यांच्या आठवणी जागवणारया पांडू या सिनेमात कुशल आणि भाऊ कदम यांनी कमाल केली. पांडू आणि म्हादू या जोडीने पुन्हा एकदा मराठी विनोदी सिनेमाचा काळ जागवला. सध्या ही जोडी चला हवा येऊ दय़ा या शोमध्ये विविधांगी व्यक्तीरेखा साकारत मनोरंजन करत आहेत. भाऊ कदमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुशलन त्याच्या विनोदीशैलीत मिश्कीलपणे शुभेच्छा देत भाऊला प्रेयसीची उपमा दिली. तसं पहायला गेलं तर हवा येऊ दय़ा या शोमध्ये कुशल आणि भाऊ अनेकदा स्त्रीवेषातही दिसतात. तर अनेक स्किटमध्ये भाऊने कुशलच्या प्रेयसीची भूमिका करून हशा पिकवला आहे. त्यामुळे कुशलच्या आयुष्यातील ही प्रेयसी दोघांच्याही चाहत्यांना खूप आवडल्याचे कमेंटमधून दिसत आहे. सोशिअल मीडियावर भाऊ कदम यांची जन्मतारीख वेगळी दर्शवली जात आहे त्यामुळे आज खरोखरच भाऊ कदम यांचा वाढदिवस आहे का? असाही प्रश्न लोक विचारताना पाहायला मिळत आहेत पण जो व्यक्ती वर्षानुवर्षे आपल्यासोबत आहे त्यानेच अशी पोस्ट केल्याने आजच भाऊंचा खरा वाढदिवस असल्याच स्पष्ट होत आहे.