
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेते किरण माने यांनी राजकीय पोस्ट केली होती. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. दरम्यान या राजकीय पोस्टमुळे त्यांना अनेकांनी धारेवर धरले होते तर ट्रोलही केले जात होते. या ट्रोलिंगला आणि धमक्यांना मी घाबरत नाही असे म्हणत सोशल मीडियावर त्यांच्याबाबत खडाजंगी सुरू झाली होती. कित्येकांनी त्यांच्या मतांचं स्वागत केलं असलं तरी कुठेतरी विरोधही होऊ लागला होता. परंतु याचाच परिणाम म्हणून की काय त्यांना स्टार प्रवाह वाहिनीच्या मुलगी झाली हो या मालिकेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

मुलगी झाली हो या मालिकेत किरण माने यांनी विलास पाटीलची भूमिका वठवली होती. माऊचे वडील अर्थात साजिरीचे वडील ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात चांगलीच घर करून होती. या तगड्या भूमिकेमुळे किरण माने यांना अमाप प्रसिद्धी मिळाली होती. मात्र आता इथून पुढे ते मालिकेचा भाग नसल्याचे समोर आले आहे. राजकीय पोस्ट केल्याने तडकाफडकी त्यांची या मालिकेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या पाठीशी असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनी यावर नाराजी दर्शवली आहे. साताऱ्यातील एका सामान्य घरातला मुलगा. अभिनयाची प्रचंड आवड असूनही आर्थिक चणचण असल्याने त्यांनी मनाविरुद्ध जाऊन इंजिन ऑइलचे काम केले होते. ‘किरण ऑटोमोटिव्ह’ या नावाने त्यांचे दुकान होते. व्यवसायात रमत असताना मात्र अभिनयाची ओढ त्यांना सतत खुणावत होती. यातूनच चित्रपट मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली होती. मुलगी झाली हो या मालिकेने त्यांना चांगली लोकप्रियता मिळवून दिली होती.

अभिनय क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी चंदेरी दुनियेत स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यामुळे मालिकेतून त्यांना काढून टाकणे अनेकांना मान्य नसल्याचे म्हटले जाते. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या बाजूने तशा स्वरूपाच्या पोस्ट देखील प्रसिद्ध केल्या आहेत. केवळ राजकीय पोस्ट केल्याने जर एका कलाकाराला मालिकेतून काढले जाते तर ही मोठी दुर्दैवाची बाब असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत असा पाठिंबा त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून मिळतो आहे. चॅनल विरोधात तसेच सरकार विरोधातही अनेकांनी त्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे. या भूमिकेमुळे किरण माने पुन्हा मालिकेत सक्रिय व्हावेत अशी ईच्छा आहे. याबाबत स्टार प्रवाह वाहिनी नेमकी कोणती भूमिका घेते याबाबत अधिक माहिती लवकरच समोर येईल. आम्ही किरण माने सोबत आहोत अशी भूमिका त्यांच्या चाहत्यांनी घेतल्याने मालिकेची टीम यावर काय निर्णय घेते हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.