प्रसिद्ध सुलेखनकार, छायाचित्रकार “कुमार गोखले” यांचे आज सोमवारी २७ सप्टेंबर २०२१ रोजी दुःखद निधन झाले आहे. कुमार गोखले हे मूळचे मिरजचे परंतु पुण्यातच ते कार्यरत होते. कुमार गोखले हे बऱ्याच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. मधल्या काळात आजारातून बरे झाल्या नंतर त्यांनी पुन्हा आपल्या कामाला तितक्याच जोमाने सुरुवात केली होती. मात्र आज त्यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. कुमार गोखले हे सुरूवातिला नोकरी करत होते नोकरी सांभाळत असताना सुलेखनाची आवड त्यांना होती. त्यांचा सुलेखनात हातखंडाच होता असे म्हणायला हरकत नाही.

काही काळ त्यांनी वृत्तपत्राचे सुलेखन केले होते शिवाय फोटोग्राफीची देखील आवड त्यांनी जोपासली होती. नाटक चित्रपटांचे डिझाइन असो वा कलाकारांचे फोटो काढणे असो या सर्व कलेत ते निपुण होते. व्हेंटिलेटर, लाल बाग परळ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा अनेक चित्रपटांचे लोगो त्यांनी बनवले होते. तर काही पुस्तकांचे मुखपृष्ठ देखील त्यांनी बनवली होती. मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी कुमार गोखले यांच्या जाण्यावर दुःख व्यक्त केलं आहे ते म्हणतात की, कुमारजी गेले !फारच धक्कादायक बातमी. लै भारी माणूस ! माझ्या लिस्टमध्ये खूप कमी, अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत, जे माझ्या विरूद्ध विचारसरणीचे असून माझ्यावर मनापासून प्रेम करणारे आहेत. संयमी शब्दांत विरोध करणारे आहेत. वैचारीक विरोधाला तेवढ्यापुरतं ठेवून ‘पर्सनल’ होऊ न देणारे आहेत. त्यातले एक आहेत आता काळजावर दगड ठेवून ‘होते’ असं म्हणावं लागतंय… प्रसिद्ध छायाचित्रकार,अक्षरसुलेखनकार,जाहिरातकार कुमार गोखले ! माझ्या ‘उलट सुलट’ नाटकाच्या टायटलच्या कॅलीग्राफीसाठी निर्माता संदेश भटनं मला त्यांचा फोन नंबर दिला “अहो किरणजी मी तुमचा फेसबुक फाॅलोअर आहे.. फार छान लिहीता तुम्ही.” असं म्हणत पहिल्या फोनमध्येच कुमारजींनी माहौल दोस्ताना केला ! त्यानंतर त्यांनी पूर्ण नाटकाची कथा-आशय ऐकून माझी या नाटकामागची भुमिका समजून घेतली नंतर मला अनेक डिझाईन्स पाठवत राहिले. आमच्या अनेक चर्चा होत राहील्या.. हळूहळू त्या चर्चा अवांतर होत मराठी भाषा, साहित्य, कला वगैरेंवर जाऊ लागल्या या सगळ्या चर्चेत माझ्या एक लक्षात आलं की कुमारजी मराठी भाषेचे गाढे अभ्यासक आहेत भाषा, तिचं सौंदर्य, तिचं व्याकरण अगदी र्हस्व दीर्घासहित अनेक गोष्टींबाबत ते काटेकोर असत ! त्यांच्या या गुणामुळे प्रभावित झालो आणि आमची मस्त मैत्री झाली…

…फोटोग्राफीवर लै जीव त्यांचा.. अनेकदा अनेक कलाकारांवर मी पोस्ट लिहीताना त्या कलाकाराचा एखादा छान फोटो शोधुन पोस्ट करत असे… पुढच्या काही मिन्टांत कुमारजींची कमेन्ट यायची, “हा फोटो मी काढलाय !” मग आमचा फोन व्हायचा. ते त्या कलाकाराविषयीच्या आठवणी सांगता-सांगता फोटोग्राफीतल्या अनेक बारकाव्यांवर मौल्यवान ज्ञान देऊन जायचे मराठी भाषा आणि फोटोग्राफीवर मनापासून प्रेम होतं या माणसाचं ते कट्टर संघविचारांचे. त्यामुळे अनेकदा आमचे मतभेदही व्हायचे. पण समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेऊन त्या मताचा आदर ठेवणारा, मी पाहिलेला एकमेव हो, मी पुन्हा सांगतो, एकमेव संघस्वयंसेवक ! मराठी नाट्यसृष्टीतलं कुमारजींचं योगदान अनमोल आहे कुमारजी, तुम्हाला खूप खूप ‘मिस’ करेन तुम्ही अजून खूप काळ हवे होतात आम्हाला भावपूर्ण आदरांजली ! – किरण माने.