मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये किरण माने यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या शोमध्ये असताना त्यांची विकास सावंत सोबत चांगली मैत्री झाली होती. तर अपूर्वा नेमळेकर सोबत त्यांनी शेवटपर्यंत पंगा घेतलेला पाहायला मिळाला. खुडूक कोंबडी पिसाळली आणि कोंबडीची पिल्लं या त्यांनी दिलेल्या उपमा घराबाहेर चांगल्याच गाजल्या होत्या. या चौथ्या सिजनमध्ये किरण माने हे ज्येष्ठ सदस्य वाटत होते मात्र तरीही बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये त्यांनी जीवतोड मेहनत घेतलेली दिसली. या शोमध्ये किरण माने यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले तरी आपला या घरात येण्याचा उद्देश सफल झाला असे ते आवर्जून म्हणताना दिसले. या घरात त्यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती तेंव्हा त्यांच्या लाडक्या लेकीने सुद्धा प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती.

किरण माने यांची लेक ईशा बिग बॉसच्या घरात आली तेव्हा तिने आपल्या बाबांना बिग बॉसची ट्रॉफी घेऊनच घरी यायचं अशी सक्त ताकीद दिली होती. ईशा नाट्य क्षेत्राचे धडे गिरवत आहेच मात्र तिला सुंदर गाताही येतं हे त्या घरात प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. किरण माने यांच्या याच लेकीने आता धाडसाचे पाऊल उचलत कलाक्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. “पारंबी” या संहितेचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः ईशाने केले आहे. उद्या रविवारी २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता नामदेव सभागृह, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे या संहितेचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. नाट्यक्षेत्रात आपल्या लेकीचं हे पहिलं पाऊल तिला यशाच्या शिखरावर नक्कीच नेऊन पोहोचवेल अशी आशा किरण माने यांना सुद्धा आहे. भविष्यात ईशा कलाक्षेत्रात भरीव कामगिरी करणार याची खात्री त्यांच्या चाहत्यांना आहे. अभिनय क्षेत्राच्या जोडीलाच किरण माने यांना लिखाणाची आवड आहे. सोशल मीडियावर हटके अंदाजात त्यांचे अनेक लेख वाचकांना वाचायला मिळतात. त्यांचा हा गुण ईशाने सुद्धा अंगिकारला आहे. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन करून ईशा आता आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कला क्षेत्रात येण्यास सज्ज झाली आहे.

तिच्या या पदार्पणाला किरण माने यांनी प्रोत्साहन देत तिचं कौतुक सुद्धा केलं आहे. किरण माने यांना बिग बॉसने अगोदर सुद्धा सहभागी होण्यासाठी ऑफर दिली होती मात्र त्यावेळी त्यांनी नकार दिलेला होता. मात्र मुलगी झाली हो मालिकेच्या वादामुळे त्यांच्या करिअर वर गालबोट लागलेले पाहायला मिळाले. यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट लिहिली होती. ‘बोललो ते करून दाखवलं भावांनो !. ..आज बरोब्बर एक वर्ष झालं ! कुठलीही चूक नसताना माझ्यावर आभाळ कोसळलं होतं. त्यावेळी मी मोठ्या आत्मविश्वासानं ही पोस्ट केली होती. त्यावेळीबी तुम्ही भरभरून सपोर्ट केलावता….आज माझ्या आनंदसोहळ्यात तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतायच… पन त्यावेळी मला विरोध करनारेबी कौतुकाची, मायेची बरसात करतायत !!! सगळ्यांचेच मनापास्नं आभार. मी तुमच्या घरातलं एक लेकरू हाय. तुकोबारायांच्या “बोले तैसा चाले” या वचनावर विश्वास ठेवून वाटचाल करतोय. मराठमोळा अभिनेता म्हनून तुम्हाला कायम अभिमान वाटंल असंच काम माझ्या हातनं होत राहील, हे वचन देतो.’