अभिनेता किरण माने ह्यांनी किशोर कदम सोबतच्या मैत्रीचा किस्सा सांगत जुन्या आठवणींना दिला उजाळा

मनोरंजनक्षेत्रासाठी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये गोदाकाठ आणि अवांछित या सिनेमांतील भूमिकांसाठी स्पेशल ज्युरी अॅवार्ड अभिनेते, कवी किशोर कदम यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने त्यांचे जुने मित्र अभिनेते किरण माने यांनी खास अंदाजात पण भावुक करणाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या किरण माने यांची जी पोस्ट गाजतेय त्यामध्ये किशोर कदम यांच्याविषयी किरण यांनी भरूभरून लिहिलं आहे. किरण आणि किशोर यांची खूप जुनी मैत्री आहे. किरण यांचा संघर्ष किशोर यांनी पाहिला आहे. तर किशोर यांच्या मेहनतीचे किरणही साक्षीदार आहेत. याच नात्यातून किरण यांनी फेसबुकवर किशोर यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

किरण या पोस्टमध्ये असं म्हणताहेत, तुझी जिद्द, चिकाटी खूप काही शिकवून जाते गडया. समर सिनेमासाठी तू राष्ट्रीय पुरस्काराची वाट पाहिली होतीस, पण तेव्हा तुला हुलकावणी दिली. दिठी सिनेमावेळीही असच झालं. आता दोन सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय तुला. एक काळ असा होता जेव्हा मी अभिनय सोडून मी साताऱ्याला परतलो, दुकान सुरू केलं. आपण नाटक करू शकत नाही या विचारानं खूप त्रास व्हायचा. एकदा गावात नाटकाची गाडी बघून तर ढसाढसा रडलो. दुसऱ्या दिवशी तुझा फोन आला आणि एका सिनेमात तू मला हवा आहेस म्हणत माझी आठवण ठेवलीस. तू मला साताऱ्यात न्यायला आलास. तो सिनेमा आला नाही, पण तुझ्याशी मी जोडला गेलो. आयुष्यातले अनेक चढउतार आपण पाहिले आहेत. माझ्या आयुष्यातील एका घटनेत तू माझ्यासोबत होतास ते मी विसरू शकत नाही. आपण गांधी विरूध्द गांधी या नाटकासाठी एकत्र केलेले दौरे मला आठवतात. किरणनी पुढे लिहिलय, तुझं नाव जाहीर होताच मी टीव्हीवर पाहिलं. लई आनंद झाला. चॅनेलवर तुझी फोनवरची प्रतिक्रिया ऐकत होतो. तुझ्या त्या पॉझमध्येही भावा, मला तुझा चेहरा दिसत होता.

तुझ्या मनात काय चाललय ते ऐकू येत होतं. आज तुला एका दनक्यात दोन ‘नॅशनल ॲवाॅर्ड’ जाहीर झाली भावा ! ‘गोदाकाठ’ आनि ‘अवांछित’ साठी तुला ज्यूरीनं ‘स्पेशल मेन्शन’ केलंय… मी टी.व्ही. बघत होतो. तुला त्या न्यूज चॅनलवरच्या मुलीनं फोनवर विचारलं, “किशोरजी, ॲवाॅर्ड मिळाल्यानंतर तुमच्या मनात नक्की काय भावना आहेत?”.. तू दोन-तीन सेकंदाचा पाॅज घेतलास… तू स्क्रीनवर दिसत नव्हतास… फोनवर बोलत होतास… मला त्यावेळचा तुझा चेहरा दिसत होता. तुझ्या मनातलं ऐकू येत होतं. …किशोर, लब्यू… लब्यू लैच किरण माने यांनी गावाकडच्या रांगड्या भाषेत किशोर यांच्यासाठी अभिनंदनाची पोस्ट लिहिली आहे. किशोर कदम यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहेत, या मांदियाळीत किरण माने यांची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.