अनेक मराठी कलाकार हे बॉलिवूडमध्ये झळकण्याचं स्वप्नं पाहत असतात. स्वप्नं पाहणं हे चुकीचं नक्कीच नाही, पण फक्त हिंदी सिनेमात हिरोच्या मागे उभा राहिलेलं दिसण्यासाठी मराठी कलाकार नसावेत हा विचारही मांडला जातो. अनेकदा अशी टीका होते की मराठी कलाकार हिंदीमध्ये एकतर नोकराची भूमिका करतात किंवा हिरोच्या मित्राची. मराठी कलाकारांना क्वचितच भरीव भूमिका दिली जाते. याच कारणामुळे मी अनेक हिंदी सिनेमे नाकारले आहेत असं म्हणणाऱ्या मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याला त्याचे चाहते कायमच वेड्यात काढतात. पण त्याच्या निर्णयाचं ठाम उत्तर जितूकडे आहे.

उत्तम अभिनेता, लेखक, निवेदक, कवी असा बहुआयामी अवलिया असलेला जितेंद्र जोशी मराठी इंडस्ट्रीत जितू नावाने ओळखला जातो. मोजके पण नेटके सिनेमे करण्यावर त्याचा भर आहे. आजवर त्याने केलेले सिनेमे हे त्याच्या चोखंदळपणाची पावती देतात. लवकरच मराठमोळा जितू थार या सिनेमात दिसणार आहे. अनिल कपूर , फातिमा सना शेख, अक्षय ओबेरॉय आणि अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन याचे पदार्पण यामुळे हा सिनेमा चर्चेत आहे. जितेद्र जोशी हिंदी सिनेमा निवडत असताना त्याची भूमिका काय आहे बघूनच निवड करतो. या कारणामुळे त्याने आजवर अनेक हिंदी सिनेमांना नकार दिला आहे. हिरोच्या मागे उभारण्याचे काम मला कधीच करायचे नाही असं म्हणत त्याने हिंदीमध्ये मराठी कलाकारांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम भूमिकांबाबत खंत व्यक्त केली आहे. जितूचे चाहते मात्र त्याला या निर्णयाबाबत वेड्यात काढतात. ते असं म्हणतात, की हिंदीमध्ये दिसलास तर तुझंच भलं होईल. तुला चांगले पैसे मिळतील. पण याला जितूचं उत्तर खूपच हटके आहे. जितू म्हणतो, हिंदीतील त्या एका सीनने मला प्रसिध्दी मिळेल, पण मला प्रेक्षकांच्या फक्त हृदयात नव्हे तर मनातही स्थान मिळवायचं आहे.

मी ज्या पद्धतीचे सिनेमे पाहतो, अनुभवतो तशाच सिनेमांमध्ये मला काम करायला आवडतं. मध्यंतरी मला एका मोठया स्टारच्या मामाची भूमिका ऑफर झाली. मामा या भूमिकेला मी योग्य नाही म्हणून नकार दिला. नाही म्हणायला शिकलच पाहिजे. थार या सिनेमातील भूमिका निवडली कारण माझ्या मनासारखी ही भूमिका आहे. सेकंड गेम्स या सिनेमानंतर अशी भूमिका मिळाल्याचा आनंद आहे. वेळ लागला तरी चालेल पण केवळ हिंदीमध्ये दिसायचं आहे म्हणून मोठया कलाकारांच्या मागे उभारण्यासाठी मी कधीच होकार देणार नाही. जितेंद्र जोशी हा एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याच सोबत तो आपलं मत ठामपणे मांडताना पाहायला मिळतो. ह्यापूवी देखील त्याने आपलं म्हणणं प्रेक्षकांसोबत मांडलं आहे. चाहते देखील त्याच्या म्हणण्याचं समर्थन करत तू आहे तसाच चांगला आहेस तू ग्रेट आहे असं म्हणत त्याच समर्थन करताना नेहमीच पाहायला मिळतात.