गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून मराठी चित्रपट सृष्टीत विविधांगी भूमिका साकारून ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी स्वतःची ओळख बनवली आहे. विनोदी भूमिका असो वा हवालदार, अथवा खलनायक जयवंत वाडकर यांनी प्रत्येक भूमिका तेवढ्याच नेटाने साकारून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. मराठी सृष्टीतला सोशल मीडियावर सर्वात जास्त ऍक्टिव्ह असलेला अभिनेता तसेच प्रत्येक सोहळ्याला आपला कॅमेरा ऑन करून ठेवणारा अभिनेता अशीही त्यांची ओळख आहे. कुठल्याही कार्यक्रमात जयवंत वाडकर हजेरी लावतात त्यावेळी तो क्षण ते आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असतात. त्यामुळे त्यांची ही ख्याती आता सर्वदूर पसरली आहे.

जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी वाडकर हिने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. महेश मांजरेकर यांच्या एफ यु चित्रपटातून स्वामिनी झळकली आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी स्वामीनीला विचारण्यात आले होते मात्र तिने या भूमिकेला नकार दिला असे बोलले जाते. नुकतेच स्वामीनीने महाराष्ट्र टाइम्सच्या श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेत सहभागी दर्शवला होता. या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांमध्ये बाजी मारत स्वामीनीने मिस पर्सनॅलिटी चा मान पटकावला आहे. त्यावरून मराठी सेलिब्रिटींनी स्वामीनीचे कौतुक करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत जयवंत वाडकर यांनी अनेक चित्रपटातून एकत्रित काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यातील मैत्रीचे नाते त्यांच्या मुलींनी देखील तेवढेच आत्मीयतेने जपलेले पाहायला मिळते. स्वामिनी वाडकर आणि स्वानंदी बेर्डे या दोघींमध्ये खूप घट्ट मैत्रीचे नातं आहे. अगदी कुठल्याही कार्यक्रमात या दोघी एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. आपल्या वडीलांमध्ये ४० वर्षांहून अधिक काळापासूनची मैत्री होती त्या दोघांच्या नंतर या दोघीनीही हे नातं असंच घट्ट टिकवून ठेवलेलं आहे असे स्वामिनी म्हणते.

स्वामीनीला मॉडेलिंग तसेच अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे. या दृष्टीने ती एक एक पाऊल पुढे टाकत आपले ध्येय्य गाठताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काही काळात स्वामिनी अभिनय क्षेत्रातही स्थिरावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेत उतरून आजवर अनेक मुलींनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेला खूप महत्व आहे. अनेक मुलींचे ह्या प्लॅटफॉर्म वरून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. अनेक मराठी सृष्टीतील कलाकारांच्या मुलींनी देखील ह्या स्पर्धेत भाग घेतलेला देखील पाहायला मिळाला आहे. स्वामीनीला तिच्या या यशाच्या वाटचालीसाठी खुप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!.