झी मराठीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेतील मदन आणि काजलची रील जोडी साकारणारे कलाकार म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री रुपाली झनकार रिअल लाईफमध्ये विवाहबंधनात अडकले आहेत. चार दिवसांपूर्वी विजय आंदळकर आणि रुपालीचा मोठ्या थाटात विवाह पार पडला होता. लग्नानंतर काही दिवसातच विजय आंदळकर स्टार प्रवाह वाहिनीवर झळकणार आहे. येत्या नव्या वर्षात १७ जानेवारी २०२२ पासून ‘पिंकीचा विजय असो’ ही नवी मालिका रात्री ११ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या मालिकेत विजय आंदळकर सुरजची भूमिका निभावत आहे तर अभिनेत्री शरयू सोनावणे पिंकीची मुख्य भूमिका साकारणार आहे. शरयुने झी युवा वरील महेश कोठारे यांची निर्मिती असलेली प्रेम पॉइजन आणि पंगा या मालिकेत काम केले होते. या मालिकेची आणखी एक खासियत अशी की, सूर नवा ध्यास नवा मधील आपल्या सुरांनी रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा मॉनिटर म्हणजेच बालकलाकार “हर्षद नायबाळ ” हा पहिल्यांदाच मालिकेत झळकणार आहे. आपल्या सुरांनी आणि शोचे सूत्रसंचालन करून हर्षदने प्रेक्षकांची मने जिंकली होती आता तो मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहणार हे नक्की. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गुंजथडी हे त्याचं गाव आहे. औरंगाबाद येथील केंद्रीय विद्यालयात शालेय शिक्षण घेत आहे. सूर नवा ध्यास नवा या रिऍलिटी शोनंतर हर्षद ‘नमो: गणराया’ या व्हीडियो सॉंग मध्ये झळकला होता. हर्षद नायबाळ हा सर्वांच्या आवडीचा कलाकार बनला त्याने गाणे गायलेले अनेक व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाले होते.

परंतु आता पिंकीचा विजय असो या मालिकेतून त्याच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळताना दिसणार आहे. या मालिकेत सुनील तावडे, पियुष रानडे, अमिता खोपकर, अंकिता जोशी, सुप्रिया पवार, अतुल, स्नेहल बोरकर , कल्याणी जाधव हे कलाकार महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत. अतरंगी सतरंगी गुलजार नार पिंकी मालिकेच्या प्रोमोमध्ये धमाकेदार एन्ट्री करताना दिसली. मालिकेच्या प्रोमोवरून सुनील तावडेंसाठी काम करणारा सुरज तितकाच दमदार दाखवण्यात आला आहे हा सूरज पिंकीच्या प्रेमात कधी पडणार याची उत्सुकता आहेच शिवाय हर्षद नायबाळ या मालिकेत आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन कसे करणार याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पहिल्या वहिल्या मालिकेसाठी हर्षद नायबळला खूप खूप शुभेच्छा…