आज ४ जून मराठी चित्रपट सृष्टीला उतरती कळा येऊ लागल्यावर त्याला आपल्या अभिनयाच्या जोरावर उभे करण्यास ज्यांचा मोठा हातभार लागला असे सर्वांचे लाडके मामा ज्येष्ठ अभिनेते “अशोक सराफ ” यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी सृष्टीत त्यांचे आगमन कसे झाले याचा किस्सा आज जाणून घेऊयात…. मूळगाव बेळगाव असलेले अशोक सराफ यांचा जन्म झाला तो मुंबईतच. मुंबईतील डी जी डी विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. १९६७ साली अशोक सराफ यांचे रंगभूमीवर पहिले पाऊल पडले ते अगदी अनपेक्षितपणेच कारण अभिनयाला विरोध करणारे त्यांचे मामा गोपीनाथ सावकार यांना अशोक सराफ यांनी या क्षेत्रात यावे असे मुळीच वाटत नव्हते.

कारण हे क्षेत्रच मुळात बेभरवशाचे त्यामुळे पुरेसा पैसा मिळेल की नाही याचीही शाश्वती देता येत नव्हती. गोपीनाथ सावकार यांनी अनेक दर्जेदार नाटक प्रेक्षकांसमोर आणली त्यातून अनेक कलाकारांना त्यांनी घडवले. रंगकर्मीला वाहून देणाऱ्या गोपीनाथ सावकार यांचा कालांतराने एक पाय लाकडाचा बसवण्यात आला होता मात्र तरीही ते इतक्या सराईतपणे रंगभूमीवर वावरत असत की भलेभले कलाकार तोंडात बोट घालत. गोपीनाथ सावकार हे अशोक सराफ यांचे मामा . त्यांच्या नाटकाच्या तालमीला अशोक सराफ नेहमी हजर राहायचे. त्यामुळे ‘ ययाती आणि देवयानी’ हे नाटक त्यांना अगदी तोंडपाठ झाले होते. पुढचा डायलॉग काय असेल हे अगोदरच पाठ असल्याने अभिनयाची आवड त्यांच्यात निर्माण झाली होती. एकदा बेळगावात असताना नाटकातील छोटू सावंत हा कलाकार आजारी पडला त्यावेळी ‘तू या धंद्यात अजिबात यायचं नाही…’ असं म्हणणाऱ्या मामांनीच अशोक सराफ यांना विदूषकाची भूमिका दिली होती. मात्र छोटू सावंत पुन्हा आला तर आपल्याकडून ही भूमिका जाणार अशी खात्री अशोक सराफ यांना वाटत होती. परंतु नाटकातील विदूषकाची भूमिका अशोक सराफ यांनी इतकी चांगली रंगवली की पुढे ही भूमिका त्यांच्याचकडे आली. तूच ही भूमिका साकारायचीस असा शिक्का मामांकडून मिळाला मात्र जेव्हा ‘माझं काम कसं झालं’ याबाबत मामांना विचारल्यावर फक्त मान डोलावून ठीक झालं असं उत्तर त्यांच्याकडून मिळालं तेव्हा हे उत्तम झालंय अशी खात्री पटली. विदूषकाच्या या भूमिकेमुळे अशोक सराफ महाराष्ट्रात तुफान हिट झाले. नाटकाच्या तालमीला गेल्यावर मात्र त्यांना अनेक बारकावे शिकायला मिळाले. शब्द उच्चारताना तो ह्रस्व आहे की दीर्घ, वाक्यात कुठे पॉज घ्यावा, चेहऱ्यावरचे हावभाव या सर्वांची शिकवण त्यांना गोपीनाथ मामांकडूनच मिळाली. जेव्हा अशोक सराफ मराठी सृष्टीत हिट झाले त्यावेळी मात्र गोपीनाथ सावकार यांना त्यांचे यश पाहता आले नाही. १९७४ साली अशोक सराफ प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले मात्र त्यागोदरच गोपीनाथ मामांचे निधन झाले होते.

या यशानंतर अशोक सराफ यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. पांडू हवालदार, आत्मविश्वास, गंमत जंमत, आमच्यासारखे आम्हीच, नवरी मिळे नवऱ्याला, आयत्या घरात घरोबा, भुताचा भाऊ, फेका फेकी, सगळीकडे बोंबाबोंब, धुमधडाका अशी अनेक हिट चित्रपटांची यादीच त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडली. चौकट राजा, आयत्या घरात घरोबा या चित्रपटातील त्यांचा निरागसपणा प्रेक्षकांना रडवुन गेला तर वजीर चित्रपटातला राजकारणी, वाट पाहते पुनवेची मधला खलनायक त्यांनी असा रंगवला की खरोखरच त्यांच्या भूमिकेचा प्रेक्षकांना राग आला. मराठी चित्रपटाला उतरती कळा आली तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडगोळीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. खरं तर कुठल्याही नटाच जास्त कौतुक करायचं नाही हा त्यांचा स्वभाव मात्र सगळ्यांना अभिनयाचे बारकावे समजावून सांगणं हा त्यांचा गुणधर्म वाखाणण्याजोगा आहे. हिंदी चित्रपटातूनही त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या कोयला, येस बॉस अशा अनेक दर्जेदार चित्रपटात त्यांना झळकण्याची संधी मिळाली. हम पांच ही त्यांनी अभिनित केलेली हिंदी मालिका खुपच गाजली होती. रेखा राव, अश्विनी भावे, किशोरी शहाणे, माधवी गोगटे, निवेदिता सराफ यांच्यासोबत जुळून आलेली त्यांची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना भावली. धनंजय माने ही त्यांची भूमिका प्रेक्षक कदापि विसरणे अशक्य. अशा अष्टपैलू कलाकाराला कुठल्याही साच्यात टाका तो अधिकच खुलत जातो हे त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. आज अशोक सराफ यांना ७४ व्या वाढदिवसाच्या आणि सुदृढ आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!…