जरा हटके

अशोकमामांच्या तोंडी “वक्ख्या विक्खी वुख्खू” हे शब्द नेमके आले तरी कसे अभिनेते अशोक सराफ यांनी केला उलगडला

अनेकदा सिनेमा हा आधी स्क्रिप्टवर तयार होतो आणि मगच तो स्क्रिनवर झळकतो. या प्रवासात सिनेमातील पात्रांच्या नावांपासून ते त्यांच्या लूकपर्यंत सगळं कसं ठरलेलं असतं. पण जेव्ह शूटिंग सुरू होतं आणि स्क्रिप्टमधली संवादफेक व्हायला सुरूवात होते तेव्हा अशा काही गंमतीजमती घडतात की त्यातून एका नव्या ट्रीकचा जन्म होतो. असे किस्से, आठवणी आपण खूपदा ऐकल्या आहेत. दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार सिनेमा पुढे जात असताना कसलेले कलाकार त्यांच्या शैलीत संवाद बोलताना त्यात असा काही फ्लेवर येतो आणि मग स्क्रिप्टच्या पलीकडे हटके अॅडीशन कॅमेऱ्यात कैद होते. असाच एक भन्नाट किस्सा मराठी सिनेमा इंडस्ट्रीचे मामा अभिनेते अशोक सराफ यांनी उलगडला.

actor ashok saraf dhumdhadaka
actor ashok saraf dhumdhadaka

मराठी इंडियन आयडॉल या शोच्या मंचावर खास पाहुणे म्हणून आलेल्या अभिनेते अशोक सराफ यांना ही आठवण शेअर केली. हा किस्सा आहे ४० वर्षापूर्वी झळकलेल्या धुमधडाका सिनेमातील. आजही अशोक सराफ यांनी धुमधडाका सिनेमातील यदुनाथ जवळकर हे उद्योगपतीचं पात्र आठवलं की ओठावर येतो तो वख्या विक्खी वुक्खू हा लोटपोट हसायला लावणारा डायलॉग. खरंतर हे शब्द स्क्रिप्टमध्ये नव्हतेच. पण ऐन शूटिंगच्यावेळी हा सीन सुरू असतानाच अशोक सराफ यांना ठसका लागला आणि हा आवाज त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफी मागितली खरी पण दिग्दर्शक महेश कोठारे यांना त्या ठसक्यातच या सिनेमाचा यूएसपी सापडला. आजही धुमधडाका म्हणजे वक्ख्या, विक्खी, वुक्खू हे समीकरण कॉमेडीसिनेमातील ‘वरचा नि’ आहे. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या धुमधडाका या सिनेमाने बॉक्सऑफीसवर खरच धमाका केला होता. महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी तो काळ गाजवत असताना ग्रामीण मराठी सिनेमाला शहरी टच दिला. महेश कोठारे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला सिनेमा. निवेदिता सराफ, सुरेख राणे, सरोज सुखटणकर, शरद तळवलकर, प्रेमा किरण, जयराम कुलकर्णी अशी कलाकारांची तगडी टीम या सिनेमात होती.

ashok saraf and mahesh kothare dhumdhadaka film
ashok saraf and mahesh kothare dhumdhadaka film

महेश कोठारे आणि अशोक सराफ यांनी या सिनेमात जीवलग मित्रांची भूमिका केली होती. महेश आणि गौरी यांच्या लग्नाला मदत करण्यासाठी अशोकमामा उद्योगपती यदुनाथ जवळकर बनून सूट बूट, हातात काठी, तोंडात पाइप या लूकमध्ये येतात त्यावेळी गौरीचे वडील झालेले शरद तळवलकर झाडांना पाणी घालत असतात. त्यांना बघताच काय माळीबुवा असा डायलॉग अशोकमामांना म्हणायचा असतो. इथंपर्यंत सगळं काही स्क्रिप्टनुसार सुरू होतं. काय माळीबुवा असं म्हणताच अशोकमामांच्या तोंडातील पाइप घशाजवळ अडकलल्याने त्यांना ठसका लागला आणि त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द होते ते म्हणजे वक्खा विक्खी वुक्खू. हा ठसका ऐकून समोर कॅमेऱ्यामागे असलेल्या महेश कोठारे यांना यदुनाथ जवळकर या पात्राला फोडणी देण्यासाठी हा डायलॉग अॅडीशन करण्याची कल्पना सुचली आणि मग काय अशोकमामांचा तो वक्खा विक्खी वुक्खू हा ठसकाही लोकप्रिय झाला. अशोक सराफ यांची ही भूमिका तर अजरामर झालीच पण आजही ठसका म्हणून लागलेले ते शब्दही लोकप्रिय झाले. याच सिनेमातील नवकोट नारायण अतिश्रीमंत असलेल्या जवळकरांसाठी या गोष्टी सामान्य असतील असं म्हणताना अतिसामान्य हा खोचक शब्दही गाजला. मराठी इंडियन आयडॉल शोच्या मंचावर अशोकमामांनी सांगितलेले असे अनेक रंजक किस्से मनोरंजनाची पर्वणी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button