ती जाहिरात पाहून दुकानात गेलो अन दुकानदाराने … ठाण्यातील ह्या दुकानात अभिनेता अंशुमन विचारेला आला वाईट अनुभव

सोशल मीडियावरच्या दुकानदारांच्या फसव्या जाहिराती अनेकदा तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. रीलमध्ये एक आणि प्रत्यक्षात तिथे गेलं तर तसं काहीच नसतं असा अनुभव आजवर अनेकांनी घेतला असेल. असाच एक अनुभव अभिनेता अंशुमन विचारे याला आला आहे. अंशुमन आणि पल्लवी हे सध्या ठाण्यात राहतात. इन्स्टाग्रामवर शूजची एक जाहिरात पाहून ते तिथे खरेदी करण्यासाठी गेले होते. ” सुपर बाय” या नावाने ठाण्यात शुजचे दुकान आहे. इथल्या ब्रँडेड शूजच्या खरेदीवर ७० टक्के डिस्काउंट मिळेल अशी एक जाहिरात इन्स्टाग्रामवर त्यांनी केली. ही जाहिरात पाहून अंशुमन कुटुंबासह शूज खरेदी करायला गेला.
पण तिथे गेल्यावर स्वतः मॅनेजरदेखील ग्राहकांकडे दुर्लक्ष करताना दिसला. गिऱ्हाईकांची कदर नसली की त्यांची टाळाटाळ केली जाते. असाच अनुभव अंशुमनला तिथे आला. शिवाय खालच्या वेअरहाऊसमधून शूज आणावे लागले म्हणून ‘पहिलं तुम्हाला सांगता नाही का येत’ म्हणत वाईट शब्दांत सुनावले. अतिशय वाईट अनुभव आणि बोलण्यातला त्यांचा उर्मटपणा पाहून अंशुमनने तिथून काढता पाय घेतला. अर्थात ब्रँडेड शूजच्या ७० टक्के डिस्काउंट वाल्या किंमतीही ५००० रुपयांच्या खाली नव्हत्या, त्यामुळे या फसव्या जाहिराती पाहून तुम्ही इथे अजिबात खरेदी करू नका असा सल्ला अंशुमनची पत्नी पल्लवी विचारे हिने एका व्हिडिओतून दिला आहे.

शूज खरेदी केला नाही म्हणून उर्मटपणे बोलणाऱ्या तिथल्या कामगाराला ‘हा तुमच्या कामाचा भाग नाही का?’ असा प्रश्न पल्लवीने त्याला विचारला. जिथे गिऱ्हाईकांशी अशा पद्धतीने बोललं जातं त्या दुकानात न गेलेलंच बरं असा निष्कर्ष या अनुभवातून तिने काढला आहे. जर अशा मालकाला थोडी जरी आपल्या व्यवसायाबद्दल काळजी असेल तर त्याने अशा कामगारांवर लक्ष ठेवायला हवं असाही सल्ला तिने दिला आहे.