गेल्या काही दिवसांपासून मालिकांमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्रीचा ट्रेंड आलाय. मालिकेच्या कथेत नवा ड्रामा आणण्यासाठी किंवा नवं वळण देण्यासाठी अशा कलाकारांच्या एन्ट्रीचा नक्कीच फायदा होत असतो. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यातही मालिकेच्या ट्रॅकमध्ये येणारा नवा कलाकार अनेकदा यशस्वीही ठरतो. काही एपिसोडपुरता का असेना असे नव्याने एन्ट्री केलेले कलाकारही प्रेक्षकांची मनं जिकंतात. आता अशीच एक नवी एन्ट्री होणार आहे ती अबोली या मालिकेत. अबोली आणि अंकुश यांच्यातील अबोला आणि दुरावा संपून त्यांच्यात प्रेम फुलत असल्याचा ट्रॅक सुरू आहे. यामध्येच आता अनिल राजपूत या हँडसम आणि डॅशिंग अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

पोलिस अधिकारी असलेला अंकुश आणि साधी गृहिणी असलेली अबोली यांच्या नात्यात नेहमीच काही ना काही गैरसमज होत होते. त्यांच्या आयुष्यातील काही व्यक्तीही त्यांच्या नातात कडूपणा आणण्याचा प्रयत्न करत होत्या. अखेर अबोलीचं मन अंकुशला समजलं आणि आता त्यांच्यातील जवळीक वाढत आहे. गेल्या आठवड्यात वटपौर्णिमेच्या एपिसोडमध्ये अंकुशने अबोलीचा उपास सोडताना तिला मिरची खायला लावली आणि अंकुशच्या प्रेमासाठी अबोली या परीक्षेत पास झाली. पण अबोलीप्रमाणेच अंकुशनेही मिरची खाऊन तिच्या वेदना अनुभवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं. अशा छोटया छोट्या प्रसंगांमध्ये अंकुश आणि अबोली एकमेकांकडे ओढले जात आहेत. मालिकेतील हा ट्रॅक प्रेक्षकांनाही खूप आवडत असल्याचं कलाकारांना सोशलमीडियावर येत असलेल्या कमेंटमधून दिसतय. अंकुश आणि अबोलीचा हा लव्ह ट्रॅक सुरू असताना आता अनिल राजपूत या मालिकेत येणार असल्याचे प्रोमो रिलीज झाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अनिल हा या मालिकेत काही एपिसोडपुरता दिसणार असला तरी त्यांच्या येण्याने अंकुश आणि अबोली यांच्या नात्यात काहीतरी टवीस्ट येणार हे नक्की. अनिल नेमकी कोणती भूमिका करणार आहे किंवा त्याचं या मालिकेत एन्ट्री होणारं पात्र काय आहे याची माहिती अजून गुलदस्त्यातच ठेवली आहे. पण अनिल राजपूतच्या चाहत्यांसाठी ही गोड बातमी आहे.

अनिलने यापूर्वी मन उडू उडू झालं या मालिकेतीही छोटीशी भूमिका केली होती. देशपांडे सर यांची मुलगी सानिकाला लग्नासाठी बघायला येणाऱ्या अमित या मुलाच्या भूमिकेत अनिल दिसला होता. अनिलने आजपर्यंत प्रेमा तुझा रंग कसा, महाराष्ट्र जागते रहो, पिंजरा खुबसूरती का, मेरे साई या मालिका, जाहिराती, नाटक यामध्ये काम केलंय. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तो एकांकिका स्पर्धा गाजवत आला आहे. अभिनय कट्टा या नवोदित कलाकारांच्या व्यासपीठावरून त्याने अनेक नाटकं सादर केली आहेत. मन हे गुंतले या व्हिडिओ अल्बममध्ये अनिलचा रोमँटीक अंदाज दिसला आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याच्या आगामी वेड या सिनेमात अनिल एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच वेड या सिनेमाचे पोस्टर लाँच झालंय. यासिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहे. २२ ऑगस्ट रोजी हा सिनेमा पडदयावर येणार आहे.