खासदार अमोल कोल्हे यांनी मनोरंजन तसेच राजकीय वर्तुळात उत्तम कामगिरी करुन मोठी पसंती मिळवली आहे. अशात त्यांच्या चाहत्यांना आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात. ते सांगतात कि माझी जुनी गाडी जवळपास ५-६ वर्षांपासून मी वापरात आहे जवळपास दीड लाख किलोमीटर चालवल्या नंतर आता गाडी बदलणे अनिवार्य असल्याने मी नवीन गाडी घेणार असल्याचं माझ्या मित्रांना समजलं तेंव्हा त्यांनी मला आपण लोकप्रधिनिधी आहात तुम्हाला साजेशी अशी महागडी बीएमडब्लू, मर्सिडीज सारखी गाडी घ्या असं सुचवलं होत.

पण अमोल कोल्हे यांनी एक नवा आदर्श मांडत एक नवी कार घेतली आहे. अमोल ते अनमोल या युट्यूब चॅनलवरुण ते जनतेशी संवाद साधतात. अशात अमोल कोल्हे यांनी त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये आता आणखीन वाढ केली आहे. नुकतीच त्यांनी टाटा कंपनीची एक चारचाकी गाडी विकत घेतली आहे. जिचं नाव आहे टाटा हैरियर. अमोल यांनी ही गाडी विकत घेतल्यानंतर त्यांच्या युट्यूब चॅनलवर त्याविषयी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी ही गाडी घेण्याचं मुख्य कारण देखील सांगितलं आहे. अमोल म्हणाले आहेत की, “मी गेल्या अनेक दिवसांपासून नवीन गाडी घेण्याचा विचार करत होतो. अशात कोरोना काळात ज्या उद्योग समूहाने सर्वात जास्त मदतीचा हात पुढे केला. तो उद्योग समूह म्हणजे टाटा. त्यामुळेच मी ही गाडी विकत घेतली आहे. पुढे व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात रतन टाटा स्कॉलरशिपचा खूप मोठा वाटा असल्याचे देखील सांगितले. तसेच रतन टाटा यांच्या कामगिरी विषयी देखील त्यांनी त्यांचे कौतुक केले.

या व्हिडिओमधून अमोल यांनी रतन टाटा यांना एक संदेश देखील दिला आहे. ते म्हणाले की, “रतन टाटा तुम्ही खरोखरच संपूर्ण तरुणाईसाठी एक मोठे आदर्श आहात. जो माणूस एक व्यवसाय करताना कायम देश हिताला प्राधान्य देऊ शकतो तर या देशाचा नागरिक म्हणून मी हा खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो.” अमोल यांनी अभिनय क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांची साकारलेली भूमिका आजही लाखो चाहत्यांच्या मनात कायम आहे. त्यांनी छोट्या पडद्यासह मोठा पडदा देखील चांगलाच गाजवला आहे. २००८ साली आलेली मालिका राजा शिवछत्रपतीने त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी दिली. त्यानंतर त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून संभाजी महाराज देखील साकारले. मी अमृता बोलतेय या चित्रपटापासून त्यांच्या मोठ्या पडद्यावरील प्रवासाला सुरुवात झाली. आजवर त्यांनी मुलगा, आघात, ऑन ड्युटी 24 तास , रंगकर्मी, बोला अलक निरंजन असे अनेक हिट चित्रपट या मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. सध्या त्यांनी घेतलेली टाटा कंपनीची ही गाडी तब्बल १७ ते १८ लाख किंमतीची आहे.