
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी हे गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. दहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने दुष्काळाची झळ कायमच सोसली आहे मात्र तरीही गुणवत्तेच्या बाबतीत हे गाव पुढारलेलं पाहायला मिळतं. या गावाला शिक्षकांचे गाव म्हणून ओळख मिळाली होती मात्र गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत असलेले अनेक जण ठीक ठिकाणी अधिकारी बनून आपल्या गावाचे नाव लौकिक करत आहेत. दरवर्षीच्या स्पर्धा परीक्षेत या गावातला कुठतले विद्यार्थी शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात यशस्वी ठरतात. पळशीच्या या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देवमाणूस या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील लालामामाची भूमिका तुम्हाला आठवत असेलच.

ही भूमिका डॉ शशिकांत डोईफोडे यांनी त्यांच्या सजग अभिनयाने चांगलीच गाजवली होती. शशिकांत डोईफोडे यांचा मुलगा चिराग शशिकांत डोईफोडे नुकताच कमर्शिअल पायलट झाला आहे त्यामुळे पळशी गावात उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने शशिकांत डोईफोडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने पळशी गावचे ग्राम दैवत श्री हनुमान मंदिरावर हॉलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचे ठरवले आहे. चिरागचे प्राथमिक शिक्षण पळशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले होते. तर पुढील शिक्षणासाठी त्याने बारामती येथे केले. डिजीसीए अंतर्गत एव्हीएशनच्या सर्व लेखी परीक्षेत तो उत्तम गुणांनी पास झाला होता. त्यानंतर कमर्शिअल पायलटचे प्रशिक्षण त्याने दिल्ली, आसाम, बंगलोर तसेच बारामती येथून पूर्ण केले आहे. शशिकांत डोईफोडे हे पेशाने डॉक्टर आहेत तर त्यांच्या पत्नी प्राथमिक शिक्षिका आहेत. माण तालुक्यातील पिंपरी येथे त्या झेडपी शाळेत शिकवतात. डॉ शशिकांत डोईफोडे यांनी देवमाणूस मालिकेत साकारलेले लालामामा हे कॅरॅक्टर हलकीफुलकी कॉमेडी करण्यात यशस्वी ठरले होते. डॉ शशिकांत हे खऱ्या आयुष्यात डॉक्टर असले तरी ते उत्तम अभिनेते आणि एक उत्तम दिग्दर्शकही आहेत. कोल्हापूर येथील मेडिकल कॉलेज मधून त्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली होती. सुरुवातीपासूनच कलाक्षेत्राची ओढ असलेल्या शशिकांत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करायचा निर्णय घेतला. २००९ ते २०१७ या काळात त्यांनी सलग सहा चित्रपट बनवले आणि ते रिलीजही केले होते. “आमदार माझ्या खिशात” हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.

“नवरा पंच बायको सरपंच”, “कसं काय मामा बरं हाय का”, “टेंडल्या निघाला ऑस्करला”, “बालाजी सांभाळ माझ्या बाळाला” अशा सामाजिक, राजकीय विषयाला हात घालून त्यांनी हे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले. सयाजी शिंदे, मोहन जोशी, सतीश तारे, सुरेखा कुडची अशा नामवंत कलाकारांना घेऊन त्यांनी हे चित्रपट बनवले. “ग्रेट माय इंडिया” हा पहिला 3D मराठी बालचित्रपट तसेच “व्हायरल” हा हिंदी चित्रपटदेखील त्यांनी बनवून प्रेक्षकांच्या भेटीला आणला. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झी मराठीवरील “मिसेस मुख्यमंत्री” या मालिकेतून त्यांनी वकिलाची छोटीशी भूमिका साकारली होती शिवाय स्वतः दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका देखील साकारल्या आहेत.