लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी सृष्टीतला एक काळ गाजवला खरं तर त्यांच्या असण्यानेच मराठी सृष्टीला खरी शोभा आली असे म्हणायला हरकत नाही. परंतु हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नव्हते त्यामागे अपार मेहनत आणि जिद्दीची सांगड त्यांनी घातलेली दिसली. आज बेर्डे बंधूंचा मराठी सृष्टीत येण्यासाठीचा स्ट्रगल नेमका कसा होता ते जाणून घेऊयात… लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई रजनी बेर्डे यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला. त्यावेळी कुठलेही दुःख असले तरी ते चेहऱ्यावर कधीच दाखवायचे नाही, कायम हसरा चेहरा ठेवून लोकांना कसं आनंदित ठेवायचं हा त्यांचा स्वभावगुण लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हेरून ठेवला होता.

लहानपणी चांगले कपडे घालता यावे आणि घरखर्चाला हातभात लागावा म्हणून त्यांनी फटाके विकले, दिवाळीत उटणं विकलं, उदबत्त्या विकल्या,लॉटरीची तिकिटं विकली मात्र दहा वर्षांनी त्याच तिकिटावर आपलं चित्र छापून येईल हे कधीच त्यांना वाटलं नव्हतं. सुरुवातीचा काळ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी फार कठीण होता. स्ट्रगल करून अनेक ठिकाणी काम मिळतंय का अशी विचारणा केली जाऊ लागली होती मात्र कुठेच काम मिळत नसल्याने हाती निराशाच आली. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चुलत बंधू प्रसिद्ध अभिनेते , लेखक आणि दिग्दर्शक “पुरुषोत्तम बेर्डे ” हे बहुतेकांना परिचयाचे असावे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरुषोत्तम बेर्डे हे दोघे बंधू मिळून कोकणस्थ वैश्य समाजात नाटकं बसवायचे. या दोघांनी मिळून “भाऊ बेर्डे” नावाने एक संस्था उभी केली होती. यातून अनेक एकांकिका, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. यात हे दोघे नेहमी सहभागी व्हायचे . पुढे पुरुषोत्तम बेर्डे जे जे स्कुल ऑफ आर्टस् मध्ये गेले तिथून एकांकिका करत राहिले तर लक्ष्मीकांत बेर्डे साहित्यसंघात नोकरी करून नाटकं करत होते. संगीतनाटक, बालनाट्य, तमाशा अशा बऱ्याच प्रोजेक्टमधून लक्ष्मीकांत बेर्डे काम करत होते परंतु म्हणावे तसे यश त्यांना मिळत नव्हते स्ट्रगल चालू असतानाच पुढे बेर्डे बंधूनी “टूरटूर” हे नाटक करायचं ठरवलं.

पुरुषोत्तम बेर्डे यांनी विजय कदम आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळींना डोळ्यासमोर ठेवूनच हे नाटक लिहीलं होतं. नटाला खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा ते नाटक चालतं मात्र नाटकाच्या सुरुवातीच्या ४०व्या प्रयोगापर्यँत प्रेक्षकांकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. हे पाहून लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाटलं की “बहुतेक मला आणखीन दहा – बारा वर्षे स्ट्रगल करावा लागतोय”… परंतु त्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे यांनी नाटकाची अनोख्या पद्धतीने जाहिरात करायचे ठरवले आणि तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रेक्षकांना नाटकाच्या प्रयोगाला खेचून आणता आलं. त्यानंतर या नाटकाचे ५०० प्रयोग यशस्वीपणे पार पडले. हे साल होतं १९८३ ह्याच वर्षी टूरटूर नाटकाच्या यशामुळे कॅमेरामन अरविंद लाड यांनी ‘हसली तर फसली’ चित्रपटात अभिनयाची मोठी संधी दिली मात्र काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण झाला नाही त्यामुळे तो प्रदर्शितही झाला नाही. टूरटूरच्या यशानंतर “शांतेचं कार्ट” हे नाटक प्रेक्षकांसमोर आलं हे नाटक देखील प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं. लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव महाराष्ट्रात दूरवर पोहोचलं. पुरुषोत्तम बेर्डे यांनी पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो “हमाल दे धमाल” या चित्रपटातही त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रमुख नायकाची भूमिका दिली. शेम टू शेम, हाच सूनबाईचा भाऊ, भस्म, निशाणी डावा अंगठा, जाऊबाई जोरात, खंडोबाचं लगीन अशा अनेक चित्रपट नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. या बहुतेक चित्रपटातून त्यांनी अभिनय देखील साकारला. अलवार, ताविज, भस्म या चित्रपट आणि नाटकांसाठी त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.