आज “नाना पाटेकर” हे मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मोठं नाव असलं तरी इथपर्यंत येण्याचा त्यांचा प्रवास हा त्या काळी खूपच संघर्षमय राहिला असल्याचे त्यांनी एका मुलाखतीतून सांगितले होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय ठप्प झाल्यावर वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षीच नाना पाटेकर यांना नोकरी करावी लागली होती. चित्रपटाचे पोस्टर लावण्याचे काम करत असताना रोज ८ किलोमीटर जाणे आणि पुन्हा घरी येणे असा १६ किलोमीटरचा प्रवास त्यांना करावा लागत होता. या कामाचे त्यांना महिन्याला ३५ रुपये आणि एक वेळचे जेवण मिळायचे. परंतु ह्या कठीण दिवसानी आपल्याला खूप काही शिकवले असे ते सांगतात.

लहानपणापासूनच नाना अतिशय खोडकर आणि फटकळ स्वभावाचे. मन्या सुर्वे हा नाना पाटेकर यांच्या मामाचा मुलगा त्यामुळे आपल्या मुलांवर वाईट संस्कार होऊ नयेत म्हणून त्यांच्या आईने गावी जाण्याचे ठरवले. इथेही नाना गप्प बसतील असे वाटत नसल्याने त्यांच्या आईनी त्यांना मावशीकडे नेऊन सोडले. परंतु दुसऱ्याच वर्षी आपलीही मुले बिघडू नयेत म्हणून मावशीने नानांना पुन्हा त्यांच्या घरी आणून सोडले. सर्व भावंडांमध्ये नाना थोडेसे कमी देखणे यामुळेच वडीलांना मी आवडत नाही अशी धारणा त्यांनी आपल्या मनाशी करून घेतली होती. गावाकडं असताना एकदा नाटकात काम करायची संधी त्यांना मिळाली. आपला मुलगा नाटकात काम करतोय म्हणून हे नाटक पाहण्यासाठी त्यांचे वडील मुंबईतून गावी आले होते. हीच संधी साधून त्यांनी वडिलांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले. पुढे वडिलांचे प्रोत्साहन मिळत गेले आणि यातूनच अभिनयाची गोडी त्यांच्यात निर्माण झाली. मधल्या काळात कलेची आवड असलेल्या नानांनी जेजे स्कुल ऑफ आर्टस मध्ये प्रवेश मिळवला. लहानपणापासूनच इंग्रजी विषयात रस नसल्याने इथे शिक्षण घेणाऱ्या मुलांना फाडफाड इंग्रजीत बोलताना पाहून ते आपल्याबद्दलच काहीतरी बोलत असतील या हेतूने त्यांची कॉलर पकडून नाना त्यांना धाक दाखवायचे.

त्यांचा हाच रुबाब बॉलिवूड चित्रपटातूनही अनेकदा पाहायला मिळाला. वजुद, परिंदा आणि मोहरे ह्या चित्रपटांत माधुरी दीक्षित सोबत नानांची जोडी सुपरहिट ठरली त्यानंतर प्रहार हा त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातही त्यांनी माधुरीला घेणं पसंत केलं आणि तो चित्रपट आधीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा चित्रपट ठरला. मराठी माणसं बॉलीवूड मध्ये काही करू शकत नाही हे विधान त्यांनी सफशेल हाणून पाडलं. कारण ह्या चित्रपटात त्यांनी मराठी कलाकारांनाच प्राधान्य दिलं होत. एक अँग्रीमॅन अशी ओळख बनलेल्या नानांनी पुढे जाऊन वेलकम चित्रपटातून “आलू लेलो ,कांदे लेलो…” म्हणत प्रेक्षकांना खळखळून हसवले तेव्हा नाना विनोदी भूमिकाही तितक्याच ताकदीने उभारतात याची खात्री पटली. पुढे नटसम्राट साकारून त्यांच्या अभिनयाची उंची अधिकच उंच होत केली असे म्हणायला हरकत नाही. मराठी हिंदी चित्रपटांत जसे त्यांनी आपलं नाव कमावलं त्याचप्रमाणे सामाजिक कामे आणि अभिनेता मकरंद अनाजपूरे ह्यांसोबत येऊन नाम फाउंडेशनची स्थापना करून अनेक गरजु महिलांना आणि शेतकऱ्यांना कामे दिली तसेच त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहिले.