
मराठी सिनेमा जेव्हा ग्रामीण लहेजातून बाहेर पडला आणि शहरी धाटणीचा झाला तेव्हा महेश कोठारे यांनी बनवलेल्या अनेक कलाकृतींनी मराठी सिनेमातील बदल अचूक टिपला. तमाशापटातून मराठी सिनेमांनी कात टाकली तेव्हा महेश कोठारे यांच्या फँटसी सिनेमांनी तरूणाईला सिनेमाकडे वळवले. काल्पनिक कथा, स्वप्नवत गोष्टी याबरोबरच लव्हस्टोरीचा हटके फॉर्मयुला महेश कोठारे यांच्या सिनेमाचा यूएसपी होता. महेश कोठारे यांच्या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे त्याकाळातील अभिनयाचे हुकमी एक्के असायचेच पण सिनेमातील कॅरेक्टर रोल किंवा व्हिलन साकारणारी महेश कोठारे टीमही ठरलेली होती. त्यामुळे लक्ष्या, अशोकमामांशिवाय बिपीन वर्टिने, जयराम कुलकर्णी आणि विजय चव्हाण यांच्याशिवाय महेश कोठारे यांच्या सिनेमाची फ्रेम पूर्ण झालीच नाही. या त्रिकूटाने महेश कोठारे यांच्या सिनेमात मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं.

महेश कोठारे यांच्या सिनेमात नेहमीच एकापेक्षा जास्त हिरो असायचे. त्यामुळे स्वता महेश कोठारे हे तर कॅमेऱ्यासमोर आणि दिग्दर्शक म्हणून कॅमेरामागे असायचेच पण लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्याही प्रमुख भूमिका असायच्या. हिंदी सिनेमाक्षेत्रात तो काळ मल्टीस्टार सिनेमांचा होता तोच फंडा महेश कोठारे यांनी मराठीत आणला आणि पुरेपूर मनोरंजनाने यशस्वी करून दाखवला. दोन ते तीन नायक, त्यांच्या नायिका, काका, मामा, मित्र असा भूमिकांचा गोतावळा, तगडे खलनायक, त्यांची गँग अशी खास ट्रीक वापरून महेश कोठारे यांनी सिनेमे बनवले. महेश कोठारे यांच्या सिनेमात लक्ष्या, अशोकमामा तर नेहमीच दिसायचे पण त्यासोबतच बिपीन, जयरामकाका आणि विजूमामा हे तीन चेहरेही हमखास असायचे.

महेश कोठारे यांनी नायकालाच नव्हे तर खलनायकाही प्रसिध्दी दिली. त्यांच्या अनेक सिनेमातील खलनायक आणि त्यांची हटके नावं हा नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. झपाटलेला सिनेमातील कुबड्या खवीस साकारणाऱ्या बिपीन वर्टिने यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. थरथराट, माझा छकुला या सिनेमातही बिपीन वर्टिने यांचा व्हिलन अंगावर येतो. तात्या विंचू जितका लोकप्रिय आहे तितकाच लोकप्रिय आहे तो कुबड्या खवीस. कवठ्या महांकाळ ही भूमिकाही गाजल्या त्या खलनायक म्हणूनच. बिपीन हे खलनायक साकारताना काहीतरी लहेजा पकडायचे त्यामुळे त्यांची भूमिका नायकांइतकीच गाजायची.

महेश कोठारे यांचा सिनेमा आणि त्यात जयराम कुलकर्णी यांची भूमिका नाही असं कधीच झालं नाही. जयराम कुलकर्णी यांनी महेश कोठारे यांच्या सिनेमांमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची केलेली भूमिका खूपच गाजली. झपाटलेल्या सिनेमातील जयराम कुलकर्णी यांची भूमिका त्यांनी अप्रतिम साकारली. थरथराट, दे दणादण या सिनेमातही नायिकेचे कडक शिस्तप्रिय वडील या भूमिकेत जयराम कुलकर्णी यांनी बाजी मारली. श्रीमंत नायिका या ट्रेंडमधील सिनेमांमध्ये जयराम यांनी नेहमीच उदयोगपती, प्रशासकीय अधिकारी य भूमिकांना न्याय देत महेश कोठारे यांना साथ दिली.

महेश कोठारे यांच्या सिनेमात नेहमीच एक विनोदी फ्लेवर आहे. या विनोदी सीनमध्ये भाव खाऊन जाणारा एक अफलातून अभिनेता म्हणजे विजय चव्हाण. झपाटलेला सिनेमात विजुमामानी आवडीच्या वडिलांना आपल्या जाळ्यात ओढून लाच दाखवून आवडीसोबत लग्न करायच्या नादात असतो पण तसं काही घडत नाही. ही भूमिका विजूमामांशिवाय कुणीच केली नसती असं वाटतं ते त्यांच्या अभिनयामुळेच. कॉमेडीसोबतच काही सिनेमात त्यांनी खलनायक किंवा ग्रे शेडच्या भूमिकाही ताकदीने केल्या. महेश कोठारे यांच्या सिनेमात कधी विनोद तर कधी डोळ्यात अंजन घालणाऱ्या संवादाचा बादशहा म्हणून विजय चव्हाण यांनी त्यांचे स्थान पक्के केले. असे खूपच कमी चित्रपट महेश कोठारेंनी बनवले ज्यात ह्या चार व्यक्ती दिसल्या नसाव्यात खरंतर हे या चारही व्यक्ती महेश कोठारेंच्या खास मैत्रीतल्या होत्या ज्यांच्याकडून महेश कोठारे याना खूप काही शिकता आलं.