Breaking News
Home / जरा हटके / आमच्या प्रवासात तो नसता तर आम्ही अभिनेत्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

आमच्या प्रवासात तो नसता तर आम्ही अभिनेत्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी या मित्रांनी एकत्रितपणे आपल्या करिअरची सुरुवात केली . करिअरच्या महत्वाच्या टप्प्यात अनेक महत्वाच्या कलाकार मंडळींची साथ त्यांना मिळाली. अगदी संतोष पवार, विकास कदम हे कलाकार देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी सृष्टीत स्थिरस्थावर झाले. यातीलच एक महत्वाचा कलाकार म्हणजे जयराज नायर. मोरूची मावशी, सही रे सही या नाटकासोबत टीव्ही मालिका तसेच लहू का हाथ, अरे देवा, रिवायत, कट्टी बट्टी, अरेदेवा, महामानव, चिंतामणी, लालबाग परळ, यारों की यारी, झाली मुंबई सोन्याची, गाव थोर पुढारी चोर अशा हिंदि मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

actor jayraj nair
actor jayraj nair

सही रे सही मधील दत्तू बेवडा हे कॅरॅक्टर त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवलं होते. त्यांच्या करिअरची सुरुवात झाली ती शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा मधून. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केदार शिंदे ने शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. पाहूया केदार शिंदे जयराज नायर यांच्या बाबत नेमके काय म्हणाले ते, जयराज नायर.. हा एक मराठी माणूस आहे. तसा तो केरळचा! पण मी त्याला भेटलो तेव्हा मी ३ वर्षांचा असेन. शाहीर साबळे आणि पार्टी मध्ये हौशी कलाकार म्हणून त्याची एन्ट्री झाली. पुढे प्रत्येक बाबांच्या मुक्तनाट्यात त्याचा सहभाग होता. ठाण्याच्या गरवारे कंपनीची नोकरी सांभाळून तो त्याचा कलेचा प्रवास करत होता. माझं कळतं वय झालं तोवर तो आमच्या घराचा मेंबर झाला होता. मी जयराज मामा म्हणतो त्याला. अजुनही! पुढे आम्ही महाराष्ट्राची लोकधारा मधे सहभागी झालो तेव्हा तो आम्हाला सांभाळून घ्यायला होता. तो केरळचा असूनही अस्खलित मराठी बोलतो याचं अप्रूप वाटायचं. पण कालांतराने तो मामा म्हणूनच जवळचा झाला आणि आडनाव मिटलच… आम्ही लोकधारा करतानाच एकांकिका करण्याच्या भुताने आम्हाला झपाटलं. आमची धडपड पाहून त्याने सुध्दा आमच्यात सामील व्हायची इच्छा व्यक्त केली. खरतर वयाने तो खुप मोठा तरीही कुठलाही आडपडदा न ठेवता तो आमच्या गॅंग मधे सहभागी झाला. हळूहळू मी व्यावसायिक रंगभूमीवर धडपड करत असतानाच त्याची कंपनी सुटली. गरवारे बंद झाली आणि तो हतबल झाला. त्याची दोन मुलं तेव्हा शाळेत होती. त्यावेळी मी श्रीमंत दामोदर पंत नाटक लिहीत होतो. त्याने भुमिका करण्याची इच्छा व्यक्त केली पण त्यात त्याला साजेसा रोल नव्हताच.

bharat jadhav and kedar
bharat jadhav and kedar

श्रुंगारपुरे हे कॅरेक्टर एका सीन साठी येत होतं. त्याला त्यासाठी कसं विचारायचं? पण त्याने मोठेपणाने ती भुमिका स्वीकारली. आजही घराघरात तो त्याच कॅरेक्टरच्या नावाने प्रसिद्ध आहे. सही रे सही करताना दत्तू बेवडा हे कॅरेक्टर मी खास जयराज मामासाठी लिहीलं. ते त्याने इमानदारीने सादर केलं. अगदी २२ वर्ष न थकता न कंटाळता तो भरत सोबत उभा आहे. आमच्या डोळ्यासमोर त्याची आणि विजय चव्हाण यांची दोस्ती आहे. आज जयराज मामा तृप्त आहे. समाधानी आहे. तो आणि मामी यांनी आपल्या मुलांना शिकवलं. वाढवलं. संस्कार दिले. आज दोन्ही मुलं परदेशात सेटलआहेत. आणि जयराज मामा रिटायर्ड न होता त्याचा कलेचा प्रवास करत आहे. हा जो फोटो आहे, तो खास आम्ही तिघांनी त्याला विनंती करून काढला आहे. कारण आमच्या या प्रवासात तो नसता तर आम्ही इथवर नक्कीच पोहोचलो नसतो. जयराज मामा वाढदिवस शुभेच्छा....

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *