सिनेमांच्या प्रमोशनवर बेतलेल्या द कपिल शो मध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींना लोटपोट हसवण्याचे काम करणाऱ्या अनेक विनोदी कलाकारांमध्ये दादी हे पात्र जास्तच लोकप्रिय झालं होतं. लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारे हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता अली असगरने ही दादी इतकी हॉट बनवली काही विचारता सोय नाही. पण आता या शोमधील दादीच्या रूपात अली असगर दिसत नाही. कपिल शोमधून बाहेर पडणारा कलाकार हा काही वाद घालूनच बाहेर पडला असेल असं वाटावं इतके या शोमध्ये वाद होत असतात. पण शोमधून बाहेर पडल्यानंतर अलीने आपलं मौन सोडून खरं कारण सांगितलं. किती दिवस मी ती रंगेल दादी सादर करू. अभिनेता म्हणून एकसुरी अभिनय करणे हे दुर्भाग्यच म्हणावं लागेल असं सांगत अलीने हा शो सोडण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

द कपिल शोमध्ये सुरूवातीपासून अली असगर हा दादीच्या रूपात दिसला. जेव्हा या शोचा दुसरा सीझन आला तेव्हाही अलीला दादी हेच पात्र रेखाटण्यासाठी सांगण्यात आलं, तेव्हाच अलीच्या मनात नाराजीची घंटा वाजली. यावरूनच अली म्हणतो, की, कॉमेडी करणं खरंतर सोप्पं नाही. त्यातही स्टँडअप कॉमेडी किंवा स्किटमध्ये काम करताना विनोदाचे टायमिंगही जपावे लागते. शिवाय एकदा का कॉमेडी कलाकार हा शिक्का बसला की प्रेक्षक तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत बघायला तयार होत नाहीत. मला या कात्रीत अडकायचे नाहीय. मी जेव्हा स्वत:ला प्रश्न विचारतो की अभिनेता म्हणून् मी किती दिवस दादी हे स्त्रीपात्र रेखाटणार आहे? त्यामुळे आता थांबायचे ठरवले आहे. म्हणून द कपिल शो या शोमधून् बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जान तेरे नाम या सिनेमातून अलीने त्याच्या अभिनयाची सुरूवात केली. सिनेमात येण्यापूर्वी अली असगर टीव्ही मालिकांमध्ये काम करत होता. जी भूमिका मिळाली ती त्याने जीव ओतून केली आहे. अलीची प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा म्हणजे जुडवा २. सध्या मात्र अलीने केवळ वरवरचे मनोरंजन करणाऱ्या भूमिका करण्यापेक्षा कलाकार म्हणून आव्हानात्मक भूमिका करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे.