अभिनेते आदेश बांदेकर ह्यांनी अडचणीच्या काळात आनंद दिघे साहेबांची भेट घेतली तेंव्हा काय घडलं ते सांगितलं

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भरलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर’ चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाची घोषणा केली त्यावेळी ही व्यक्तिरेखा कोण साकारणार? याबाबत उत्सुकता होती. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्यात आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा प्रसाद ओक साकारणार असल्याचे दिसून आले. प्रविण तरडेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळं आनंद दिघे नक्की कोण होते? याचा उलगडा चित्रपटातून होणार आहे.

आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार करणे, गरिबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर जरब बसवणारं ते एक थोर व्यक्तिमत्त्व होतं. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसं त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. ‘कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला, दोन्ही खिसे रिकामे असलेला सर्वात श्रीमंत राजकारणी महाराष्ट्रानं पाहिला’, ‘जंगलात राहून वाघाशी, महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं.’ असे दोन संवाद या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. आनंद दिघे यांना कलाकारांच्या स्ट्रगलची जाणीव होती. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवख्या कलाकारांना देखील त्यांनी सढळ हाताने मदत केली होती. आदेश बांदेकर यांनीही त्यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे. आदेश बांदेकर आपल्या सुरुवातीच्या काळात मंथन हा कार्यक्रम करत होते अजित गायकवाड हे या कार्यक्रमाचे निर्माते होते. एक दिवस गडकरी रंगायतानमध्ये दिघे साहेबांनी आमचा कार्यक्रम पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला. आमच्या एका संस्थेसाठी हा कार्यक्रम करायचाय असं त्यांनी सांगितलं. मी तो कार्यक्रम केला. दुर्दैवाने कार्यक्रम झाल्यानंतर ज्या व्यक्तीकडून मानधन घ्यायचे होते ती व्यक्ती बाहेरगावी फिरायला गेली होती. पैसे अडकून पडल्याने आणि समोरच्याला देणं असल्याने आदेश बांदेकर यांनी दिघे साहेबांची भेट घेण्याचे ठरवले.

घाबरत घाबरतच ते आनंद दिघे यांच्याकडे गेले. आनंद दिघे यांनी आदेश बांदेकर यांना पाहिले तेव्हा अत्यंत आदरपूर्वक त्यांनी बसायला सांगितले आणि चहाची सोय केली. आदेश बांदेकर त्यावेळेला नवखे कलाकार असल्याने त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती मात्र असे असूनही दिघे साहेबांनी कलावंतांचा असा आदर केलेला पाहून ते पुरते भारावून गेले होते. अजूनही कलाकारांना त्यांच्या मानधनाचे पैसे मिळाले नसल्याचे त्यांना समजताच त्यांनी ५ मिनिटं थांबायला सांगितलं. जी व्यक्ती पैसे देणार होती ती व्यक्ती देखील त्यांच्या ऑफिसमध्येच येत होती पण दिलेला शब्द कसा पाळायचा हे आनंद दोघे यांच्याकडून शिकलं पाहिजे कारण ती व्यक्ती पोहोचायच्या आतच आनंद दिघे यांनी स्वतःजवळचे पैसे आम्हाला देऊ केले होते. हा कलावंत आहे आणि त्याचा सन्मान राखला पाहिजे भले तो प्रसिद्ध असो किंवा नसो ही त्यांची भावना मी स्वतः अनुभवली आहे. त्यानंतरही आमचे सगळे कार्यक्रम त्यांनी करायला दिले होते. १९८७ -८८ च्या काळात आम्ही रात्री अपरात्री उशिरापर्यंत कार्यक्रम करायचो पण याबाबत कुठलीही अडचण आली तरी मला सांगा असा विश्वास त्यांनी आम्हाला दिला होता.