आई कुठे काय करते या मालिकेत देशमुख कुटुंब सध्या त्यांच्या गावी गेलेल पाहायला मिळत आहे. इथे अनिरुद्ध अरूधंतीला ‘मी तुझ्याकडे परत येण्यास तयार आहे ‘असे आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतो मात्र अरुंधती या घेतलेल्या निर्णयाला पूर्णपणे नकार देते. लवकरच मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या मुलाचा म्हणजेच अभिचा साखरपुडा होणार आहे. अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याचा सोहळा नुकताच चित्रित झाला असून या सोहळ्याचे काही क्षण तुम्हाला फोटोमार्फत पाहायला मिळत आहेत.

साखरपुड्याच्या क्षणी गौरी, यश आणि ईशा यांनी नृत्य सादर केले आहे. तर त्यांच्यासोबत अभि आणि अनघा यांनीही ठेका धरलेला पाहायला मिळतो आहे. येत्या काही भागातच साखरपुड्याचा हा सोहळा आणि तिथली धमाल मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लवकरच देशमुख कुटुंबात अनघाचेही आगमन होणार हे स्पष्ट होत आहे. तर तिकडे संजना देखील आपल्या लग्नाची जोरदार तयारी करताना दिसत आहे मात्र देशमुख कुटुंब गावी गेल्याने गौरी आणि संजनाचेही तिथे आगमन होत आहे. गौरीच्या येण्याने यश भलताच खुश झालेला पाहायला मिळतो आहे मात्र संजनाच्या येण्याने मालिकेत काय मोठे वळण लागेल हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लवकरच ईशाचे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे एका हिंदी मालिकेत झळकणार आहे. वागळे की दुनिया या हिंदी मालिकेतून अपूर्वाला एक महत्वाची भूमिका साकारायची संधी मिळत आहे. त्यामुळे पुढील काही भागांमध्ये ईशाचे पात्र पाहायला मिळणार का ती आई कुठे काय करते मालिकेतून एक्झिट घेणार हे येत्या काही काळातच अधिक स्पष्ट होईल.