बहुतेक टीव्ही मालिकांना प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. टीआरपीच्या रेसमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आई कुठे काय करते या मालिकेला देखील हे ट्रोलिंग चुकलेले नाही. जेव्हा अशा विरोधी प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रेक्षक व्यक्त करताना दिसतात त्यावेळी त्याचे खूप वाईट वाटते अशी भावना मालिकेच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोल यांनी व्यक्त केली आहे. पहाटे उठून दारू पिऊन मालिका लिहिता का?…असा संतप्त प्रश्न या मालिकेच्या लेखकांना ट्रोलर्सकडून विचारण्यात येतो त्यावेळी अशा प्रतिक्रियांना मुग्धा गोडबोले यांनी एक समर्पक उत्तर दिलेले पाहायला मिळाले.

एका मुलाखतीत याबाबत उत्तर देताना मुग्धा गोडबोले आपल्या लेखनाबाबत म्हणतात की, खरं तर मालिकेचा विषयच खूप वेगळा होता कारण सुरुवातीला जेव्हा या मालिकेबाबत विचारण्यात आले त्यावेळी काय काय लिहायचं या बाबत संभ्रम होता. ही मालिका चाळीशी ओलांडलेल्या स्त्रीवर आधारित होती त्यामुळे या मालिकेत विनोदी किंवा मजेशीर प्रसंग नसणार याची खात्री होती. आई कुठे काय करते ही मालिका एका बंगाली मालिकेवर आधारित आहे त्यामुळे त्या मालिकेचे काही भाग बघितले आणि मालिकेतील एक एक पात्र लेखनातून पुढं येत राहिले. सुरुवातीला मालिका पाहिल्यावर अनेक महिलांनी खूप छान प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. ह्या प्रकारच्या गोष्टी आजही समाजात पाहायला मिळतात आणि तुम्ही खूप छान मुद्दा आपल्या मालिकेतून मांडला म्हणून कौतुकही झाले होते. जे आहे तेच विषय आम्ही मालिकेतून मांडले, अनेक विषयांवर सखोल विचार करण्यात आला त्याचेही वेळोवेळी कौतुक झाले. अशा विषयांना हात घातल्यामुळे अनेक दिग्गजांनी मला मेसेज करून अभिनंदन केले. यात सुमित्रा भावे यांनी केलेला कौतुकाचा मेसेज माझ्यासाठी खूप खास ठरला होता तिथेच संजय मोने यांनी देखील तोंड भरून कौतुक केले हे महत्वाचे होते.

एकीकडे कौतुकाचे मेसेजेस येत असताना सोशल मीडियावर मात्र लेखकांच्या नावाने टीकाही पाहायला मिळाल्या. लेखक सकाळी दारू पिऊन गांजा मारून मालिका लिहितात का? असाही प्रश्न टीकाकारांनी उपस्थित केला. त्यावेळी एवढंच म्हणावंसं वाटतं की, मालिका लिहिणे ही साधी गोष्ट नाही. रोज अर्धा तास प्रेक्षकांसमोर काय आणायचं याचा प्रश्न आम्हाला नेहमीच पडत असतो. प्रेक्षकांसमोर असे मुद्दे मांडणं हे काही सोपं नाही. विशेष म्हणजे अमच्यासारखं काम करण्यासाठी अनेकांच्या कडून विचारणा केली जाते की तुम्ही असे वर्कशॉप घेणार का?. काहींना हे खूप सोपी गोष्ट वाटते त्यांना एवढंच सांगू इच्छिते की मला स्वतःला एक एपिसोड लिहायला ५ ते ६ तास लागतात. जेव्हा अशा दोन तीन मालिका मी लिहिते तेव्हा माझे दिवसातले १५ तास लागतात. केवळ दोन तासासाठी हे काम नसून फुल टाइम तुम्हाला वेळ द्यावा लागतो पण तरीसुद्धा लोकांना या क्षेत्रात यायचंय याचा मला आनंद आहे…