अभिनयक्षेत्रात असलेल्या कलाकारांना कधी कोणती भूमिका फळाफुलाला येईल हे त्यांनाही सांगता येत नाही. अनेक वर्ष काम केल्यानंतर हातात अशी भूमिका येते की करिअर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतं. मग ती भूमिका नायक किंवा नायिकेचीच असली पाहिजे असं नाही. सध्या तर टीव्ही मालिकांमध्ये खलनायिकांचाच बोलबाला जास्त आहे. खलनायिका बनून नायिकेच्या आयुष्यात सतत विघ्न आणणाऱ्या खलनायिकांमध्ये बाजी मारत असलेल्या आई कुठे काय करते या मालिकेतील संजना ही भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्री रूपाली भोसले हिलाही अशीच लॉटरी लागली.

पण मुळातच रिप्लेसमेंट म्हणून संजनाच्या भूमिकेत आलेली रूपाली ही या रोलसाठी पहिली पसंती नव्हतीच. अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिच्याकडे ही ऑफर आधी गेली होती पण तिचा नकार रूपालीच्या फायद्याचा ठरला. नेहमीच टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल ठरलेल्या आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. अनिरूध्द देशमुख आणि अरूंधती देशमुख यांच्या नात्यात बिब्बा घालणारी संजना ही भूमिका आहे. संजनामुळेच अनिरूध्द आणि अरूंधती वेगळे झाले आणि अजूनही संजनाचे किचन पॉलिटिक्स सुरूच आहे. देशमुख कुटुंबाभोवती फिरणाऱ्या या मालिकेतील संजनाची भूमिका रूपालीकडे आली तेव्हा त्याआधीच्या अभिनेत्रीने संजनाच्या भूमिकेला रामराम ठोकला होता. तिच्याजागी कोण येणार या चर्चेत अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिचे नाव होते. पण तिने या भूमिकेसाठी नकार दिला आणि संजना या भूमिकेसाठीच्या नावाचा शोध रूपाली भोसले हिच्याजवळ येऊन थांबला. पण या संधीचं रूपालीने इतकं सोनं केलं की आज आई कुठे काय करते या मालिकेची चर्चा संजनाचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

दरम्यान, सध्या सुलेखा दिल के करीब हा शो तिच्या यू ट्यूब चॅनेलवर चालवते ज्यामध्ये ती कलाकारांच्या मुलाखती घेते. सुलेखाने संजनाच्या या भूमिकेसाठी का नकार दिला हे तिने सांगितले नाही. त्यापूर्वी सुलेखाने सरस्वती या मालिकेत नकारात्मक भूमिका केली होती. तर अवंतिका, असंभव या तिच्या मालिकाही गाजल्या. माझा होशील ना आणि सांग तू आहेस का या मालिकांमध्येही सुलेखाच्या भूमिका या नकारात्मक किंवा काहीशा ग्रे शेडच्या होत्या. त्यामुळेच संजनाच्या रोलसाठी आधी सुलेखाचे नाव होते पण तिने नकार दिल्यानंतर रूपाली भोसलेची निवड झाली. तेव्हा रूपाली बिग बॉस या शोमुळे चर्चेत होती. तर तिच्या व्यक्तीगत आयुष्यातील काही घटनांमुळेही रूपाली प्रसिध्दीच्या झोतात होती. संजना या भूमिकेला न्याय देण्यात रूपाली यशस्वी ठरली हे मात्र नक्की.