काही दिवसांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे ची मुलगी स्वानंदी बेर्डे हिने Ehaa’s Creations नावाने एक्सकलुझिव्ह साड्या, ड्रेस मटेरियल आणि दुपट्टा आणि ज्वेलरी यांचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे स्वानंदी बेर्डेचे नव्या व्यवसायानिमित्त खूप कौतुक होताना दिसत आहे. मराठी सृष्टीत असे बरेचसे कलाकार आहेत जे व्यवसाय क्षेत्रात उतरलेली पाहायला मिळतात. आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहवरील मालिका देखील खूपच लोकप्रिय आहे या मालिकेतील अरुंधतीची मैत्रीण देविका हिने देखील नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. कालच तिने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केलेली पाहायला मिळत आहे.

मालिकेत देविकाची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “राधिका देशपांडे” हिने. आभिनयासोबत राधिका उत्तम लेखिका, दिग्दर्शिका आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून राधिकाने तेजश्री प्रधानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. मधल्या काळात तिने स्वतःच्या राधिका क्रिएशन्स या नावाने ऍक्टिंग स्कुल उभारले. यामार्फत अनेक मुला मुलींना तिने अभिनयाचे धडे दिले आहेत शिवाय त्यांना घेऊन काही नाटकांचे सादरीकरण केले आहे. वृत्तपत्रासाठी अनेकदा ती ब्लॉग रायटरची भूमिका बजावताना दिसते. राधिका आता स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू करत आहे. ‘Twios ‘ या नावाने तिचा लहान मुलांचा कपड्यांचा ब्रँड आहे. ज्यात लहान मुला मुलींसाठी आकर्षक डिझाईनमध्ये बनवलेले कपडे खरेदी करता येतील. ‘Twiosintl’ या नावाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. यावर तुम्हाला तिच्या ब्रॅंडमध्ये काय काय समाविष्ट केले आहे याची यादी पाहता येईल. साधारण दोन दिवसांपूर्वी सुरू केलेल्या तिच्या या व्यवसायाला अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.