एक स्त्री ही एक उत्तम मुलगी, पत्नी, सून आणि एक मायाळू आई असते या वाक्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका होय. या मालिकेने आज अनेक घरांमध्ये मोठे बदल घडवले आहेत. अशात लवकरच मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये लवकरच देविका म्हणजेच अभिनेत्री राधिका देशपांडे पुन्हा एकदा एन्ट्री करणार आहे. काही दिवसांसाठी ती कामानिमित्त बाहेर गेली असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले होते. अशात आता अरुची ही मैत्रीण पुन्हा एकदा तिच्या पाठीशी उभी राहणार आहे. मालिकेमध्ये देविकाने आता पर्यंत अरुंधतीला खूप मदत केली आहे.

तिच्या आयुष्यातील मोठ्या वाईट प्रसंगात देविका तिच्या बरोबर होती. तिने कायमच अरुला आधार दिला आहे. मालिकेमध्ये कायमच अरुच्या वाटेला दुःख असल्याचे दिसते. ती दररोज नवीन आव्हानांना तोंड देत असते. अनिरुद्ध बरोबर घटस्फोट झाल्यानंतर अरुंधती खूप खचली होती. अशात तिच्या आयुष्यात तिचा जुना मित्र आशुतोष आला. त्याने देखील अरुंधतीला खूप साथ दिली. त्याच्यामुळे तिने आपल्या सांगितला पुन्हा एकदा चालना दिली आणि तिचं स्वतःचं “सुखाचे चांदणे” हे गाणं देखील लॉन्च केलं. मालिकेत तसेच सोशल मीडियावर देखील तिच्या या गाण्याला मोठी पसंती मिळाली आहे. अशात मालिकेत सध्या ईशा आणि साहील यांचा ब्रेकअप झाल्याचे दाखवले आहे आणि या ब्रेकअप साठी ईशाने आपल्या आई वडिलांना जबाबदार ठरवले आहे. ईशा या नात्याला घेऊन फारच सिरीअस होती. ब्रेकअपमुळे ती खूप दुःखी झाली. अशात अरुंधती ईशाला समजावत म्हणते की, “तू माझी मुलगी आहे. तू इतक्या सहजासहजी हार मानू शकत नाही.” तर या सर्व प्रकारामुळे अरुंधती कामावर देखील सुट्टी टाकते. आणि ईशाच्या बोलण्याचा विचार करते.

अशात अनिरुध्द देखील पुन्हा एकदा अरुंधतीला त्याच्या घरी राहायला सांगेल असे चित्र मालिकेत दिसत आहे. पण यामुळे अरु पुन्हा एकदा संसाराच्या विळख्यात अडकेल आणि म्हणूनच देविका पुन्हा एकदा मालिकेत येणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. राधिकाने या मालिकेत देविका हे ग्रे पात्र खूप छान पद्धतीने साकारलं आहे. यामध्ये तिचा बेधडक आणि डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतो. राधिका ही एक अभिनेत्री असून ती लेखिका देखील आहे. तसेच ती लहान मुलांना नाटक देखील शिकवते. त्याचबरोबर तिच्या स्वतः च्या मालकीची राधिका क्रियेशन ही कंपनी देखील आहे. आता मालिकेत पुन्हा एकदा देविकाच्या एन्ट्रीने मालिकेला कोणते वळण लागणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.