आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिची रिअल लाईफ स्टोरी एका चित्रपटाचे कथानक वाटावे अशीच आहे. रुपाली भोसले हिचे कुटुंब कोणकोणत्या संकटातून पुढे आले होते याची कहाणी तिने स्वप्नील जोशींच्या “शेअर विथ स्वप्नील” या रेडिओ शोमध्ये सांगितली आहे. रुपाली भोसले आज यशाच्या शिखरावर असली तरी इथपर्यंत येण्यासाठी तिने अपार मेहनत घेतली होती. ह्याची सुरुवात झाली ती त्यांच्या कुटुंबात आलेल्या एका वादळामुळे. रुपाली मुंबईच्या बीडीडी चाळीत लहानाची मोठी झाली. नववीत शिकत असताना तिच्या काकाने वडिलांना एक स्कीम सुचवली.

या स्कीममध्ये रुपालीच्या वडिलांनी जवळ होते नव्हते तेवढे सगळे पैसे काकांकडे सुपूर्त केले होते. या स्कीममुळे रुपालीच्या वडिलांची फसवणूक झाली आणि तिच्या काकांना अटक करण्यात आली. मात्र यामुळे रुपालीचे संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर आले होते. अक्षरशः खाण्यासाठी देखील त्यांच्या हातात पुरेसे पैसे नव्हते. नववीत शिकत असलेल्या रुपालीला आर्थिक चणचणीमुळे शिक्षण सोडावे लागले. अशातच रुपालीच्या काकीने राहते घर विकून त्यांच्याकडे येण्याचा सल्ला दिला मात्र यात काकीने देखील त्यांच्या कुटुंबाला पूर्णपणे लुबाडले. घराचे आलेले सर्व पैसे काकीने लुबाडले आणि रूपालीच्या कुटुंबाला घरातून हाकलून लावले. भर पावसात रुपालीचे कुटुंब आसरा शोधत होते. रुपाली आणि तिचा लहान भाऊ पावसाने भिजू नये म्हणून आईने त्यांच्या डोक्यावर ताडपत्री धरली होती. अशा कठीण प्रसंगाला तोंड देत असताना रुपालीच्या आईला दोन वेळा हृदयाचा झटका येऊन गेला. हे कुटुंब रस्त्यावर दिवस काढतय हे पाहून रुपालीच्या वडिलांचे एक मित्र त्यांच्या मदतीसाठी धावून आले होते. परंतु त्या मित्राच्या समोरच एक मोठा प्रश्नचिन्ह होता की आपले स्वतःचेच कुटुंब एवढे मोठे आहे या कुटुंबाला आपण आसरा कुठे देणार? घरात एवढी मोठ्या माणसांचा राबता असताना मित्राने रुपालीच्या कुटुंबाला आपल्याच घरात एक दिवसाच्या राहण्याची सोय करून दिली. दुसऱ्या दिवशी लगेचच एक छोटी पत्र्याची खोली त्यांना पाहून दिली.

या पत्र्याच्या खोलीत अगोदर गुरे बांधली जायची परंतु दुसरा पर्याय नसल्याने आणि हातात पैसे नसल्याने त्या गोठ्यात त्यांना राहावे लागले. गोठ्यात तात्पुरती राहण्याची सोय झाली असली तरी त्याच्या भिंतींना अनेक तडे गेले होते. त्याला मोठमोठाली छिद्र देखील पडली होती. बाहेरील बाजूने आतमध्ये सहज डोकावता येऊ शकत असल्याने रुपाली पहाटे ३ वाजता उठून अंघोळ उरकून घ्यायची. रुपालीचा भाऊ लहान होता मात्र त्याला आपल्या कुटुंबाची होणारी वाताहत कळत होती. यातूनच त्याच्या मनात एकदा आत्म’हत्या करण्याचा विचार आला. हे पाहून रुपालीने नोकरी करायचा निर्णय घेतला. अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने आपल्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला. केवळ नववी इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्या रुपालीने पुढे जाऊन हिंदी मालिकांमध्ये स्थान मिळवले. मालिका , चित्रपट असा तिचा हा प्रवास खरोखर उल्लेखनियच म्हणावा लागेल. कुटुंबाला सावरून आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या रुपालीने अभिनय क्षेत्रात आता आपला पाया घट्ट रोवला आहे. आई कुठे काय करते या मालिकेतून ती विरोधी भूमिका साकारत आहे. या भूमिकेने रुपालिला प्रसिद्धी तर मिळवून दिलीच शिवाय या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या रोषालाही तिला सामोरे जावे लागत आहे. हीच तिच्या सजग अभिनयाची पावती ठरली आहे…