आई कुठे काय करते या मालिकेची चर्चा नाही असा एकही दिवस नसेल. या मालिकेतील समृध्दी हा देशमुखांचा बंगला आता या मालिकेतील कलाकारांसाठी सेट नव्हे तर दुसरं घरच बनला आहे. मालिकेतील कलाकारांना अगदी लॉकडाउनकाळात शूटिंग सुरू असतानाही अनेक सुविधा मिळाल्या. तसेच कलाकारांची खूप काळजीही सेटवर घेतली जाते. इतका सगळा कम्फर्ट झोन असताना या मालिकेची नायिका अरूंधतीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली मधुराणी गोखले हिला सेटवर जर ही गोष्ट करायला मिळाली नाही तर ती खूपच अस्वस्थ होते. मधुराणीने हीच अस्वस्थता इन्स्टापेजवर बोलून दाखवली आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी मधुराणीला स्वस्थ बसू देत नाही हे पाहून तिचे चाहते मात्र सुखावले आहेत.

सध्या मराठी मालिका, सिनेमा, नाटक या क्षेत्रात अभिनयात घोडदौड करत असलेले कलाकार एक उत्तम वाचक, लेखकही आहेत. जसे अभिनयाच्या वेडाने त्यांना या क्षेत्रात आणले असले तरी त्यांनी त्याच्या वाचनाची, लेखनाची नाळ तोडलेली नाही. काय वाचताय या प्रश्नावर अनेकवेळा, वाचायचं असतं पण वेळ मिळत नाही अशी कारणं देणाऱ्यांना हेच १८ -१८ तास काम करणारे कलाकार सेटवर मिळेल त्या जागी आणि मिळेल तेवढया वेळात पुस्तकांचा फडशा पाडून उत्तर देतात. पक्की वाचक असलेल्या मधुराणीनेही अशाच वेगळ्या अंदाजात पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देत तुम्ही काय वाचताय हे कळवा अशी आपुलकीची विनंतीही केली आहे. तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की , मिळेल ती जागा आणि मिळेल तितक्या क्षणांची फुरसत चिमटीत पकडायची आणि जमेल तितकं वाचायचं , भले एक पुस्तक वाचायला महिना लागो पण ते पुरं करायचं….वाचलं नाही काही चांगलं तर फार अस्वस्थ होतं. मी एक शक्कल लढवलेय. सेटवर एक , मी सकाळचा चहा प्यायला बसते तिथे एक आणि बेडवर एक अशी तीन पुस्तक ठेवलेली असतात . तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची. जमेल तसं…दोन पानं , कधी चार . पण वाचायचं…वाचत राहायचं. जागतिक ग्रंथ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.

सध्या मधुराणी आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवरच , मंद्र, सूर्य गिळणारी मी . आणि जग बदलणारे ग्रंथ ही तीन पुस्तकं वाचत आहे. अभिनयासोबत मधुराणी कवयित्रीही आहेत. शिवाय कवितावाचनातही तिचा हातखंडा आहे. कवितेचं पान हा शो ती तिच्या यूट्यूब चॅनलवर करते. वाचनाची ही गोडी तिने अभिनयाच्या व्यस्ततेतही कायम ठेवली आहे. आई कुठे काय करते या मालिकेत गेल्या दोन वर्षापासून मधुराणीचा सगळा दिवस या मालिकेच्या सेटवरच जातो. त्यामुळे वाचायला कधी वेळ मिळणार हा प्रश्न तिच्यासमोरही होता. पण यावरच तिने उपाय शोधला आणि सेटवर मिळेल त्या जागी, मिळेल तेवढ्या वेळात ती हातात घेतलेल्या पुस्तकाचे एक पान तरी वाचतेच. अभिनयात तर मधुराणीने बाजी मारली आहेच, पण वाचनचळवळ सुरू ठेवण्यासाठी मधुराणीचा हा पुस्तक प्रपंच अनेकांना वाचनाची प्रेरणा देणारा नक्कीच आहे.