आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहवरील मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेची नायिका म्हणजेच अरुंधती आता आपल्या आयुष्यात येणारे सुखाचे क्षण अनुभवताना दिसत आहे. नुकतेच अरुंधतीने स्वतःचे घर खरेदी केले आहे. एकीकडे अरुंधतीच्या आयुष्यात येणारे सुखाचे क्षण मालिकेच्या प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे ठरत आहेत तिथेच दुसऱ्या बाजूला तिला त्रास देणाऱ्या कांचनबाईंना संजनाच्या विचित्र वागण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. संजना आपली सून आहे आणि ती आता आपलं सगळं काही करेन हा विश्वास मनाशी बाळगून असणाऱ्या कांचनबाईंना मात्र संजनाच्या विचित्र वागण्यामुळे पश्चाताप होऊ लागला आहे.

तर आपल्या सासूबद्दल आदर वाटणाऱ्या अनघाने देखील अरुंधतीची बाजू कायम सांभाळली आहे. अप्पांचा वाढदिवस अरुंधती तिच्या नवीन घरात साजरा करते त्याचवेळी अभि अनघाला फोन करत असतो. अनघा फोन उचलत नाही म्हणून तो तिच्यावर चिडतो. त्यामुळे आता अभि आणि अनघाच्या संसारात वादाची ठिणगी टाकण्याचे काम संजना करताना दिसत आहे. मालिकेत अनघाने अरुंधतीच्या बाजूने घेतलेली ठाम भूमिका प्रेक्षकांना देखील पटली आहे. त्यामुळे अनघाचे पात्र तितकेच उठादार झालेले पाहायला मिळते. अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने तिच्या अभिनयाने चोख बजावली आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी तिचे कौतुक केलेले पाहायला मिळते. झी मराठीवरील अस्मिता, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांमधून अश्विनीने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. काही दिवसांपूर्वी अश्विनीने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली होती. त्यावरून अश्विनी निलेश जगदाळे याच्या प्रेमात आहे अशी चर्चा रंगली होती.

निलेश जगदाळे हा व्यवसायिक असून तो देखील कलासृष्टीत सक्रिय असलेला पाहायला मिळतो. मोरया प्रॉडक्शन हाऊस या निर्मिती संस्थेतून वेबसिरीज, चित्रपट आणि इव्हेंट मॅनेजमेंट त्यांनी केले आहे . एवढेच नाही तर ‘फार्म फ्रेश ऑरगॅनिक फ्रेश’ हा व्यवसाय ते सांभाळताना दिसतात. या व्यवसायाअंतर्गत मसाले, लोणचे, ड्रायफ्रूट, फळे, हळद, केसर यांची विक्री केली जाते. अश्विनी महांगडे हिने रयतेचे स्वराज्य या प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या सामाजिक कार्यात निलेशची देखील खंबीर साथ अश्विनीला मिळताना दिसते. त्यामुळे अश्विनी निलेशच्या प्रेमात आहे असा विश्वास तिच्या चाहत्यांना वाटू लागला आहे. अभिनयासीबतचे अश्विनी सामाजिक कार्यात देखील नेहमीच सहभागी असलेली पाहायला मिळते.