आई कुठे काय करते या मालिकेच्या कथानकात गेल्या काही दिवसात अनेक नवीन पात्र सहभागी झाली. मालिकेला नवं वळण लावण्यासाठी आता या मालिकेत अजून एक नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. बिग बॉस फेम मीरा जगन्नाथ लवकरच या मालिकेत खास भूमिकेत दिसणार आहे. सतत काही ना काही ड्रामा, रंजक वळणं घेत छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मालिकांच्या आलेखात आई कुठे काय करते या मालिकेने चांगलच स्थान मिळवलं आहे. अरूंधती, अनिरूध्द, आई आप्पा आणि तीन मुलं यांच्या नात्याची गोष्ट असलेल्या या मालिकेत आजपर्यंत अनेक पात्र नव्याने दाखल झाली. आता अजून एक पात्र मालिकेत पहायला मिळणार आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथ हीची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. आता ती कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. आई कुठे काय करते ही मालिका सध्या उत्सुकता ताणवत रंजक वळण घेत आहे. अरूंधतीचा मित्र आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या आशुतोषच्या कुटुंबीयांशी संबंध ठेवायचे नाहीत यावरून सध्या आई अप्पांचा वाद सुरू आहे. संजना आणि अनिरूध्द यांच्यातील नात्यातही खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. तर तिकडे अरूंधती मात्र अलिप्त राहूनही देशमुख कुटुंबाशी धागा जोडून आहे. या सगळ्या प्रवाहात आता अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही नव्या पात्रासह या मालिकेत येणार आहे. तिच्या येण्याने अर्थातच मालिकेत असं काही वळण येणार आहे की त्यासाठीच प्रेक्षक आतूर आहेत. मीरा जगन्नाथ ही यापूर्वी येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमो या भूमिकेत दिसली होती. मोमोची भूमिका काहीशी विनोदी, वेंधळी अशी होती. मीराने या छोट्या भूमिकेतही आपल्या अभिनयाने जान आणली. त्यानंतर मीराची वर्णी लागली ती बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये. या शोमध्ये ती विजेती झाली नसली तरी तिने लक्ष वेधून घेतले. या शोमध्ये पुष्कर जोगसोबतच्या तिच्या खास मैत्रीचे अनेक किस्से रंगले.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मीराने तुझी माझी यारी या वेबसीरीजमध्येही काम केलं. अभिनयासोबत पाककृती बनवण्याची आवड असलेली मीरा उत्तम डान्सरही आहे. लग्नं केलच तर ते एकत्र कुटुंब पध्दती असलेल्या घरातील मुलाशी व्हावं असं तिनं ठरवलं आहे. बऱ्याच दिवसांनी मीरा पुन्हा छोट्या पडद्यावर येत असल्याने तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. मीरा जगन्नाथ याआधी एका वादग्रस्त विषयामुळे चर्चेत आली होती. मी टू मोहिमेअंतर्गत मीरानेही तिचा कास्टिंगकाउचचा अनुभव सोशलमीडियावर शेअर केला होता. कॉलेजमध्ये असताना मुलाच्या वेशभूषेतील फोटो तिने शेअर केला होता, त्यावरून तिच्यावर ट्रान्सजेंडर असल्याचा आरोप झाला होता. पण तिने त्यामागचं सत्य सांगितल्यानंतर हा विषय थांबला.