
आई कुठे काय करते मालिकेत सध्या धक्कादायक वळण लागले आहे. मालिकेत यश आणि गौरीच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू असतानाच कुटुंबामध्ये त्यांच्या होणाऱ्या भावी मुलांवरून चर्चा सुरू होते. त्यावर गौरी मी कधीच आई होऊ शकणार नाही याचा खुलासा करते. गौरीचे हे बोलणे ऐकून कांचन या सोहळ्यातच वाद घालू लागते. अरूधंतीला गौरीबाबत सर्व माहीत असूनही ती गप्प का असते याचा राग त्यांना आलेला असतो. आता कांचनबाई यश आणि गौरीचा साखरपुडा मोडणार का की आणखी काही वेगळे घडणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मालिकेतील आप्पा खऱ्या आयुष्यात आपल्या लेकीच्या निर्विघ्न पार पडलेल्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहेत.

मालिकेत आप्पांची भूमिका साकारली आहे अभिनेते किशोर महाबोले यांनी. काही दिवसांपूर्वी किशोर महाबोले यांची लेक सृष्टी महाबोले हिचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. आपल्या लेकिच्या लग्नात तिच्यासोबतचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यासोबतच चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे त्यांनी आभार देखील मानले आहेत. ते म्हणतात “माझी मुलगी चि.सौ.का. सृष्टीच्या लग्नात आपण आशीर्वाद पाठवले त्यामुळे लग्न निर्विघ्न पार पडले धन्यवाद।” किशोर महाबोले हे गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. “पवित्र रिश्ता” या लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी अर्चनाच्या वडिलांची मनोहर करंजकर यांची भूमिका साकारली होती. शिवाय स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून फिरंगोजी यांची व्यक्तिरेखा साकारली होती. सुलतान शंभू सुभेदार, मी शिवाजी पार्क, बस्ता, कुंकू झाले वैरी, आई शप्पथ, सखी, द लेजंड ऑफ भगतसिंग अशा बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या आहेत. आई कुठे काय करते मालिकेतील आप्पाच्या भूमिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी त्यांना सेटवर समजली. अशावेळी त्यांनी आपले काम पूर्ण करण्याला प्रथम प्राधान्य दिले. यावरून त्यांचे सहकालाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी देखील कौतुक केलेले पाहायला मिळाले होते.