‘किस्से छोट्या अभिषेक आणि अमृताचे’ असे म्हणत आई कुठे काय करते या मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुख याच्या आईने त्याच्या बालपणीचे धमाल किस्से सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालिकेतील यश आणि खऱ्या आयुष्यातला अभिषेक सेम आहेत असे त्याची आई म्हणते अभिषेक देशमुख आणि अमृता देशमुख हे दोघे बहीण भाऊ लहानपणी कसे होते ते त्यांच्याच लेखणीतून जाणून घेऊयात ” नमस्कार मंडळी , सध्या स्टार प्रवाह वर अभिषेक ची ‘आई कुठे काय करते’ ही सिरीयल सुरू आहे , त्यात तो ‘यश’ ची भूमिका साकारतोय . काही दिवसांपूर्वी सिरीयल च्या एका एपिसोड मध्ये छोट्या यश चा अभ्यास घेताना चा प्रसंग आईला म्हणजे अरुंधतीला आठवतो.

तो एपिसोड बघितला आणि मला सुद्धा अभिषेक अमृता च्या लहानपणी चे अनेक गमतीदार किस्से आठवले म्हटलं चला आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हा सगळ्या मित्र मंडळीं बरोबर ते शेअर करावे आणि तुमची पण घटकाभर करमणूक करावी सिरीयलमध्ये जसा यश खोडकर ,मिश्किल दाखवला आहे तसाच अभिषेक लहानपणी होता.अजूनही तसाच आहे. तो एक दिड वर्षाचा होता तेंव्हा शेजारच्या काकू त्याला खेळवायला यायच्या आणि त्याचा खोडकर पणा बघून त्याचे हात धरायच्या आणि म्हणायच्या, बांधू बांधू का तुला एक दिवस त्या आल्या आणि त्या काही म्हणायच्या आधीच अभिषेकच त्यांना म्हणाला बांधू बांधू तुला त्या काकूंची हसून हसून पुरेवाट अभिषेक असेल तेंव्हा दोन वर्षांचा ,आम्ही एका लग्नाला गेलो होतो , तो त्याच्या काकूंच्या कडेवर होता ,काकूने एक दोन जणांना सांगितले ,हा सतीश चा मुलगा आहे , अजून एक नवीन व्यक्ती समोर आल्याबरोबर अभिषेक ने च त्यांना पटकन सांगितले , मी सतीश ला मुलगा आहेसगळ्यांची हसून हसून पुरेवाट त्याचा एक स्वतंत्र शब्दकोश होता,तो चांदोबा ला दिंबा म्हणायचा , कंगव्याला बम्मी , गाडीच्या टायर ला आत्तीन्ना , चेंडू ला टिंनू असे अनेक शब्द ज्याचा अर्थ फक्त आधी मला कळायचा मग नंतर आमच्या कॉलनी तील लोकं पण ते शब्द वापरू लागले बाबांसारखे दिसतात म्हणून तो त्याच्या एका काकांना बाबीकाका म्हणायचा आणि दुसरे काका आजोबांसारखे दिसायचे म्हणून त्यांचे नामकरण त्याने काजोबा असे केले होते. अशी बरीच टोपणनावे त्याने ठेवली आहेत.

आमच्या घरासमोर एका घराचे बांधकाम सुरू होते,अभिषेक असेल तेंव्हा दोन तीन वर्षांचा , तो तिथे वाळूवर खेळत होता ,तिथला म्हातारा वॉचमन बिडी ओढत बसला होता , अभिषेक ने बराच वेळ त्याचं निरीक्षण केलं आणि मग त्याला म्हणाला, तुमची पाळी झाली की माझी पाळी हं द्या मला आता तो माणूस त्याला आमच्या घरी घेऊन आला आणि म्हणाला बघा मॅडम हा काय म्हणतोय त्याला हसू आवरत नव्हते एकदा त्याला घेऊन त्याचे बाबा एका मित्रा कडे गेले होते,अभिषेक तेंव्हा तीन चार वर्षाचा असावा मित्राच्या बायकोला वाटले याला काहीतरी खाऊ द्यावा, तिने विचारले तुला काय आवडतं अभिषेक, एका क्षणाचा ही विलंब न लावता अभिषेक म्हणाला, मला किनई जिलबी ,गुलाबजाम, श्रीखंड ,पुरणपोळी आवडते तिने हातच जोडले त्याच्या समोर, म्हणाली सॉरी हं बाळा ,आता हे मी तुला देऊ नाही शकणार, पण एक बिस्कीट किंवा चॉकलेट देते. आम्ही एकदा आमच्या मित्राचा नवीन फ्लॅट बघायला गेलो होतो , चार पाच वर्षाच्या अभिषेकला तो फ्लॅट खूपच आवडला असावा कारण तो त्या काकांना पटकन म्हणाला , तुम्ही मेलात की हा फ्लॅट आमचा! झालं पुढच्या क्षणी तिथे हास्य कल्लोळ. अभिषेक प्ले गृपला होता त्याचे बाबा त्याला सोडायला मोटारसायकल वर जायचे ,तेंव्हा पुढे बसलेला अभिषेक त्यांना म्हणायचा , बाबा .. मी तुमच्या एवढा मोठा झालो की तुम्हाला पण असाच मोटार सायकल वरून शाळेत सोडणार त्याला बहुतेक असं वाटायचं की आपण मोठे झालो की बाबा छोटे होणार एकदा त्याच्या बाबांना तो सहज म्हणाला की बाबा तुमच्या लहानपणी सगळं जग ब्लॅक अँड व्हाईट होतं न अमृता पाच सहा महिन्यांची असताना छोटा अभिषेक तिला खेळवत होता , ती पाळण्यात होती ,तेवढयात अभिषेक चे बाबा पाळण्या जवळ आले तर अभिषेक ने काय म्हणावं ,अमृता घाबलू नको हं हे भूत नाही बलं का,आपले बाबाएत रडू नकोरडू नकोत्याच्या बाबांना मात्र तेंव्हा हसावं का रडावं कळेना.

अभिषेकला लहानपणापासून च नवनवीन कपडे ,शूज याची फार आवड ,असाच एकदा तो त्याच्या बाबांसमोर आला आणि म्हणाला, बाबा मला नवीन शूज घेऊन द्या ना ,आणि कृपा करून ते पुन्हा सांगू नका ,की आम्हाला कसे लहानपणी बूट वगैरे काहीच नसायचे ,एक चपलांचा जोड आम्ही वर्ष वर्ष वापरायचो .. वगैरे वगैरे मग त्याचा राग न येता आम्हाला हसूच यायचं अभिषेक खूप बडबड्या आणि अमृता एकदम शांत होती ,अभिषेक च्या गमतीदार बोलण्याने सगळ्यांना हसू यायचं तर अमृता च्या गमतीदार वागण्याने विनोदनिर्मिती होत असे अमृता अगदी तान्ही असल्यापासून तिला गाणी खूप आवडायची , पण आश्चर्य म्हणजे जुनी संथ गाणी लावली की ती रडायची आणि नवीन जोरदार ठेक्याची गाणी लावली की एकदम शांत व्हायची एकदा असंच टीव्ही वर रात्री दिल सिनेमा सुरू होता आणि त्यातलं गाणं सुरू झालं ,आज न छोडेंगे तुझे ,दम दमा दम अमृता जेमतेम एक वर्षाची असेल , ती समोर गाढ झोपलेली .. गाणं लागल्या बरोबर ताडकन उठली आणि पूर्ण गाण्यावर तिने डान्स केला ,आणि गाणं संपल्यानंतर पुन्हा गादीवर आडवी! तिचा तो झोपेतील परफॉर्मन्स बघून आम्ही सगळे हसून हसून बेजार अमृता अगदी लहानपणापासून , भाजीवाले , फेरीवाले ,आजूबाजूचे लोकं यांच्या नकला अगदी हुबेहूब करायची आणि आमची हसून हसून पुरेवाट तिने एकदा तिच्या बाबांना ,तिला काय काय हवे आहे त्याची एका कागदावर लिस्ट करून दिली आणि खाली लिहिलं होतं धन्यवाद, जय हिंद ! हे ती कुठून शिकली होती कोण जाणे …