कॅन्सर होऊ नये म्हणून….अक्षया देवधरचे वयाच्या ९ व्या वर्षांपासून ते ४५ वर्षांपर्यंत मुलींना महिलांना आवाहन
कॅन्सरसारख्या गंभीर स्वरूपाच्या आजाराने डोके वर काढलं आहे. या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हाईवल कॅन्सर या दोन्ही कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. यावर उपाय काय असा प्रश्न उपस्थित केला जातो. अभिनेत्री अक्षया देवधर हिने यावरचा एक उपाय सुचवला आहे. या आजारावर व्हॅक्सीन उपलब्ध असल्याचे तिने निदर्शनास आणून दिले आहे. कॅन्सर होऊ नये म्हणून हे व्हॅक्सीन आपल्या मुलींना द्या अशी तिने सर्वांना विनंती केली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देताना अक्षया म्हणते की, “सर्व्हाईकल कॅन्सरवर एक व्हॅक्सीन आलेलं आहे ‘ एच पी व्ही’ असं या व्हॅक्सीनचं नाव आहे. यामध्ये तीन डोस उपलब्ध आहेत आणि हे तीन डोसचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे. मला खेद वाटतो की या व्हॅक्सीनबद्दल मला अजिबात माहिती नव्हती. हे व्हॅक्सीन येऊन बरेच दिवस झालेले आहेत मात्र अजूनही कोणाला याबाबत फारशी माहिती नाही.
मला हे आता कळलं म्हणून मी ते व्हॅक्सीन घेतलं. आता माझे दोन डोस कम्प्लिट झाले आहेत, तिसऱ्या डोससाठी मला अजून दोन महिने थांबायचं आहे. मला असं वाटतंय की कॅन्सरबाबत महिलांनी जागरूक होणं गरजेचं आहे. माझा हा व्हिडीओ कोणी पुरुष बघत असतील तर त्यांनी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या महिला मुलींपर्यंत हा मेसेज जरूर पोहोचवा. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या स्त्री रोग तज्ञाला जाऊन भेटा. पण ज्यांना जवळचे स्त्री रोग तज्ञ माहीत नाहीत त्यांनी पुण्यातील आपटे रोडवरील बिनीवाले क्लिनिकला भेट द्या जिथे मी ही ट्रीटमेंट घेत आहे. वयाच्या ९ व्या वर्षांपासून ते ४५ वर्षांपर्यंत मुलींनी, महिलांनी हे व्हॅक्सीन घेणं गरजेचं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही हे व्हॅक्सीन घेणार तेवढा चांगला परिणाम तुम्हाला मिळणार आहे.
त्यामुळे ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ” असे म्हणत अक्षयाने सोशल मीडियावर महिलांना कॅन्सरबाबत जागरूक राहण्यास सांगितले आहे. अक्षया देवधरचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मराठी सेलिब्रिटींनी तिच्या या व्हिडिओचे कौतुक केले आहे आणि ही माहिती दिल्याबद्दल तिचे धन्यवाद मानले आहेत. २०२२ मध्ये सर्व्हाईकल कॅन्सरवर ही व्हॅक्सीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध शाळांमध्ये मुलींना ही लस देण्यात आली होती पण याबाबत अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे असे मत अक्षयाने इथे व्यक्त केलं आहे.