
स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘छत्रीवाली’ ही मालिका प्रसारित होत होती. मधुरा आणि विक्रम यांची प्रेमकहाणी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. नम्रता प्रधान आणि संकेत पाठक या कलाकारांनी या मालिकेतून प्रमुख नायक नायिकेच्या भूमिका बजावल्या होत्या तर अशोक शिंदे, आशा शेलार या कलाकारांचीही साथ या मालिकेला लाभली होती. अभिनेत्री नम्रता प्रधान हिने प्रथमच छत्रीवाली या मालिकेतून छोट्या पडद्यावर आगमन केले होते. या मालिकेमुळे नम्रताला अमाप प्रसिद्धी मिळाली होती.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री नम्रता प्रधान विवाहबद्ध झाली आहे. १३ फेब्रुवारी रोजी तिने बॅचलर पार्टी साजरी केली होती त्याचे फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. तर १४ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून तिने मंदार देवरुखकर सोबत एंगेजमेंट केली होती. नम्रता आणि मंदार नुकतेच विवाहबंधनात अडकले असून लग्नाचे फोटो देखील तिने इंस्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मंदार देवरुखकर हा प्रोफेशनल फोटोग्राफर असून अनेक लग्नसोहळ्याचे फोटो त्याने आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत. लग्नसोहळ्यात नम्रताने सफेद आणि लाल रंगाची साडी परिधान केली होती तर मंदारने देखील तिला साजेशा असा सफेद रंगाच्या शेरवानीचा पेहराव केलेला पाहायला मिळाला. अभिनयाव्यतिरिक्त नम्रताने मॉडेलिंगही केले आहे. शिवाय कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर तीने फॅशन डिझायनिंग केले होते. अगदी लहानपणापासूनच नम्रता वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात हिरीरीने सहभागी व्हायची. छत्रीवाली या मालिकेतून तिने साकारलेली मधुरा रसिकांना खूपच भावली होती. नम्रता प्रधान आणि मंदार देवरुखकर यांना आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…