“विवाह सोहळा” हा शब्द आपल्या सर्वांना चांगलाच परिचयाचा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामुदायिक विवाहसोहळे आयोजित केले जातात हेही सर्वांना माहीत आहे परंतु मागील काही दिवसांपूर्वी “घटस्फोट सोहळा” नावाचे फलक असलेला एक फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोत येडे पाटील आणि म्हात्रे पाटील अशा दोन कुटुंबाचा घटस्फोट सोहळा असे दर्शवण्यात आला होता. पण घटस्फोट सोहळा कोण साजरा करतो आणि तेही एवढ्या थाटामाटात? असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हा कुठल्याही घटस्फोट सोहळ्याचा फोटो नसून तो चक्क एका मराठी चित्रपटाच्या प्रमोशनचाच भाग आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या युक्त्या करण्याची क्रेझ सध्याच्या काळात पाहायला मिळते आहे. मग त्यात दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाची केलेली होर्डिंगबाजी असो वा आणखी काही पण “मंगलाष्टक रिटर्न” या चित्रपट प्रमोशनसाठी केलेली ही भन्नाट कल्पना रसिक प्रेक्षकांना टॉकीजपर्यंत खेचून आणेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मंगलाष्टक रिटर्न हा चित्रपट प्रसाद ओक चा असून या चित्रपटात आनंद इंगळे, श्वेता खरात, सक्षम कुलकर्णी, शीतल अहिरराव, सोनल पवार यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक योगेश भोसले हा चित्रपट दिग्दर्शित करत असून एका नव्या कोऱ्या विषयाला प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हिंजवडी , पुणे येथे या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतेच सुरू करण्यात आले होते. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच घटस्फोट सोहळा असं नाव असलेल्या कमानीचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला होता. आणि फोटोसह बऱ्याच मनोरंजक अशा कमेंट्सचा माराही पाहायला मिळाला. परंतु सुरुवातीलाच चर्चेचा विषय ठरलेला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला कधी येणार आहे हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरत आहे.