कलर्स मराठीवरील “राजा राणी ची गं जोडी ” या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत सुजित ढाले पाटील हे पात्र देखील प्रेक्षकांना खूपच भावले असून या पात्राला लवकरच येऊ घातलेल्या कलर्स मराठी अवॉर्डमध्ये लोकप्रिय भावंड आणि लोकप्रिय प्रमुख व्यक्तिरेखा अशी दोन नामांकन मिळाली आहेत. आज सुजित ढाले पाटील ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “पार्थ घाटगे”.

पार्थ घाटगे याने या मालिकेअगोदर जाडूबाई जोरात, गणपती बाप्पा मोरया, श्रावणबाळ रॉकस्टार, ड्राय डे, लग्न मुबारक अशा मालिका तसेच चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. लिखाणाची अतिशय आवड असलेल्या पार्थने सबकाँशिअस आणि एक सेल्फी आभाळाचा या लघुपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात संबळ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला त्यात प्रमुख नायकाची भूमिका पार्थने साकारली होती. पार्थ घाटगे हा प्रसिद्ध निर्माते “अण्णासाहेब घाटगे” यांचा नातू आहे. पंढरीची वारी या गाजलेल्या चित्रपटाची जबाबदारी अण्णासाहेब घाटगे यांनी अतिशय सुरेख बजावली होती हे त्या चित्रपटाच्या लोकप्रियतेवरूनच तुमच्या लक्षात येईल. नणंद भावजय, पाटलीण अशा आणखी दर्जेदार चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. तर पार्थचे वडील निशांत घाटगे हे देखील निर्माते, नाट्यसंयोजक आणि निर्मिती व्यवस्थापक म्हणून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी नाट्य रसिकांसाठी त्यानी ‘चैतन्य रसिक कला मंच ‘ ही संस्था उभारली होती. आजोबा आणि वडिलांकडून मिळालेला कलेचा हा वारसा पार्थने जपला असला तरी अभिनयात तो सरस ठरलेला पाहायला मिळतो.