१९३६ साली “संत तुकाराम” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. तब्बल ५७ आठवडे चालणारा हा चित्रपट त्यावेळी प्रभात फिल्म कंपनीचे अगोदरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणारा हाऊसफुल चित्रपट ठरला होता. परदेशात दाखवला गेलेला हा पहिला मराठी चित्रपट अशीही ओळख या चित्रपटाने निर्माण केली होती. तर १९३७ सालच्या ५ व्या व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला पुरस्काराने गौरविण्यात आले होते. प्रभात फिल्म कंपनीचे विष्णुपंत दामले आणि शेख फत्तेलाल यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची धुरा सांभाळली होती. विष्णुपंत पागनिस यांनी संत तुकारामांची भूमिका तर त्यांच्या मुलाची भूमिका याच चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णुपंत दामले यांच्या मुलाने म्हणजेच पंडित उर्फ वसंत विष्णुपंत दामले यांनी साकारली होती.

चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीत जे सध्या FTII नावाने ओळखले जाते त्या स्टुडिओतच करण्यात आले होते. अगदी तुकारामांनी नदीत बुडवलेल्या गाथांचे चित्रीकरण तिथल्याच बनवलेल्या तळ्यात करण्यात आले होते. संत तुकाराम वैकुंठाला गेले हे चित्रीकरण दाखवण्यासाठी गरुडाची रचना केली होती. दोन वेळा हे गरुड कलाकारांना घेऊन उडाले परंतु तिसऱ्या वेळी मात्र ते गरुड खाली कोसळले. त्यावर बसलेले विष्णुपंत पागनिस( संत तुकारामांची भूमिका साकारणारे कलाकार) यांच्यासह असलेल्या दोन महिला कलाकार (पऱ्या) आणि गरुडामध्ये त्याचे पंख हलवण्यासाठी बसलेला एक व्यक्ती असे चौघेही त्या गरूडासोबत खाली कोसळले. या घटनेमुळे भयंकर धुळ तिथे पसरली तर गोंधळामुळे अनेकांना दुखापतही झाली. चित्रीकरण पाहायला मिळावे यासाठी प्रभात स्टुडिओत दररोज शेकडो लोकं येत असत. या अपघातावेळी स्टुडिओत जवळपास ५०० जणांचा जमाव असल्याचे सांगितले जाते. सुदैवाने महिला कलाकारांच्या बाजूने गाद्या असल्याने त्यांना काही दुखापत झाली नव्हती तर विष्णुपंत पागनिस यांना तुकारामांच्या पत्नीची भूमिका (जिजाई) साकारणाऱ्या कलाकार गौरी यांनी त्या ढिगाऱ्यातून बाहेर खेचले होते.

मात्र दुर्दैवाने गरुडाच्या आत बसलेली ती व्यक्ती या दुर्घटनेत भयंकर जखमी झाली होती. त्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले परंतु यात त्यांना कायमचे अपंगत्व आले. त्यानंतरही प्रभात कंपनीने या व्यक्तीला कायमस्वरूपी कामावर ठेवले होते. चित्रपटाची आणखी एक आठवण म्हणजे प्रभातच्या चित्रपटाची सुरुवात आणि शेवट ही तुतारीच्या आवाजाने होत असे. संत तुकाराम हा चित्रपट हाऊसफुल चालला त्यावेळी चित्रपट संपला तरी शेवटच्या क्षणी ती तुतारी वाजली नसल्यामुळे प्रेक्षक जागेवरच बसून राहिले. त्यावर अयोजकाला काय करावे हेच समजेनासे झाले. यावर युक्ती काढून ऑपरेटरला त्यांनी पहिला रील दाखवण्यास सांगून पडदा खाली ओढला. तुतारी वाजली म्हणजे चित्रपट संपला असे समजून प्रेक्षकांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. चित्रपटाच्या या काही आठवणी यातील बालकलाकार असलेले पंडित उर्फ वसंत दामले यांनी एका मुलाखतीत सांगितल्या होत्या २०१५ साली वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.