होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून अभिनेता शशांक केतकरने मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. इथेच टाका तंबू, हे मन बावरे, ३१ दिवस, रंग माझा वेगळा या चित्रपट आणि मालिकेनंतर शशांक पुन्हा एकदा झी मराठीवर नव्याने सुरू होत असलेल्या “पाहिले न मी तुला” मालिकेतून दिसणार आहे. शशांक केतकर ह्याच्या प्रमाणेच त्याची धाकटी बहिणही आता लवकरच एका नव्या कोऱ्या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ह्या मालिके बद्दल आणि तिच्या बद्दल अधिक जाणून घेऊयात…

शशांक केतकरची धाकटी बहीण “दीक्षा केतकर” छोट्या पद्द्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून ती एका प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर ” तू सौभाग्यवती हो” ही मालिका लवकरच प्रसारित होत आहे या मालिकेतून दीक्षा केतकर ही ‘ऐश्वर्याचे’ प्रमुख पात्र साकारत आहे. दीक्षा सोबत अभिनेता हरीश दुधाडे एकत्रित झळकणार असून या मालिकेत तेजस्विनी पंडित हिची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री “ज्योती चांदेकर पंडित ” या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिक्षाची ही पहिलीच मालिका असल्याने आपल्या भूमिकेबाबत ती खूपच उत्सुक असलेली पाहायला मिळते आहे. दीक्षा मराठी सृष्टीत एक अभिनेत्री म्हणून आपला जम बसवताना दिसत आहे याअगोदर तिने CRSHD, सेफ जरनी आणि धूसर मधून काम केले आहे. परंतु छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे भूमिकेला जास्त वाव मिळत असल्याने बरेचसे कलाकार प्रकाशझोतात आलेले दिसतात. त्यामुळे पदार्पणातील ही पहिलीच मालिका दीक्षासाठी खास ठरणार आहे. दीक्षा केतकरला तिच्या या पहिल्या वहिल्या मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा…