
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. वाजले की बारा…या गाण्यावर एका रिक्षा चालकाने सादर केलेला लावणी नृत्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला त्याला सोशलमीडियावरही चांगलीच लोकप्रियता मिळाली. व्हिडिओत नृत्य सादर करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे “बाबाजी कांबळे”. बाबाजी कांबळे हे मूळचे बारामतीतील गुणवडी या गावचे असून बारामती शहरात ते रिक्षा चालवत असतात. एकदा त्यांच्या मित्रांनी त्यांचा नृत्य करतानाचा हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल होत गेला. वाजले की बारा… नटरंग चित्रपटातील हे गाणं अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यावर चित्रित झालं होतं स्वतः अमृताने देखील या व्हिडिओची दखल घेऊन बाबाजी कांबळे यांनी सादर केलेल्या नृत्याचे कौतुक केले.

एक पुरुष असूनही त्यांनी लावणी नृत्याचे केलेले हे सादरिकरण तुफान लोकप्रिय झाले त्यांचे नृत्य पाहून प्रत्यक्षात एका लावणीसम्राज्ञीलाही लाजवेल असे नृत्य त्यांनी सादर केले अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून व्यक्त होत होती. यातूनच बाबाजी कांबळे यांच्या नृत्याला सगळीकडून वाहवा मिळाली. आता तर त्यांना चक्क एका मराठी चित्रपटात काम करण्याची ऑफरही आली आहे आणि तेही एक नव्हे तर तब्बल दोन चित्रपटात त्यांना काम करण्याची नामी संधी मिळाली आहे. “चल रे फौजी” आणि “कवच” या दोन आगामी चित्रपटातून बाबाजी कांबळे यांना मराठी चित्रपटात झळकण्याची संधी मिळत आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक घनश्याम येडे यांनी नुकतीच बारामतीत जाऊन बाबाजींची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी बाबाजींना चित्रपटात अभिनय साकारायची संधी देणार असल्याचे सांगितले होते. बोला अलख निरंजन या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन घनश्याम येडे यांनी केले होते तसेच या चित्रपटातून त्यांनी अभिनय देखील साकारला होता. लावणी नृत्यामुळे बाबाजी कांबळे यांना अमाप प्रसिद्धी मिळाली आणि दोन चित्रपटाच्या ऑफरमुळे मिळालेल्या प्रसिद्धीचे खरे चीज झाले असे म्हणायला आता हरकत नाही. सोशल मीडिया हे आता नवख्या कलाकारांना चांगली प्रसिद्धी मिळवून देण्याचे एक मध्यम झाले आहे. यातून कधी कोणाचे नशीब फळफळेल हे सांगणे कठीण आहे….