रामायण मालिकेतील ‘भरत’ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मुलगा आहे मराठी सृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता


प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दूरदर्शन वाहिनीवर रामायण मालिकेचे पुनःप्रक्षेपण केले गेले होते. या मालिकेत बाळ धुरी, जयश्री गडकर, ललिता पवार, संजय जोग यांसारखे बरेच मराठी कलाकार झळकले आहेत. त्यातीलच भरतची भूमिका अभिनेते “संजय जोग” यांनी साकारली आहे. संजय जोग हे मूळचे नागपूरचे. त्यांचे आजोबा ‘नाना जोग’ हे विदर्भ साहित्य संघाच्या संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जात. एक उत्कृष्ट नाट्यकर्मी तसेच लेखक म्हणूनही कला क्षेत्राशी ते निगडित होते. आताच्या हॅम्लेट हे शेक्सपिअर वर आधारित नाटकाचे लेखन त्यांनीच केले होते. तर संजय जोग यांनी देखील आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी चित्रपट तसेच बॉलिवूड चित्रपटातूनही काम करण्यास सुरुवात केली.

आम्ही दोघे राजा राणी, नवरी मिळे नवऱ्याला, जिगरवाला, बेटा हो तो ऐसा अशा अनेक चित्रपटातून भूमिका साकारल्या. रामायण मालिकेतील भरतची भूमिका त्यांनी तितकीच उठावदार निभावलेली पाहायला मिळाली. कला क्षेत्रातील प्रवास चालू असतानाच त्यांचे १९९५ साली किडनी विकाराने निधन झाले. संजय जोग यांच्या पत्नी नीता जोग या पेशाने वकील आहेत तर रणजित आणि नताशा ही दोन अपत्ये त्यांना आहेत. रणजित जोग हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणून सर्वांना परिचित आहे. आपले पणजोबा नाना जोग यांनी लेखन केलेल्या हॅम्लेट या नाटकात रणजीतने महत्वाची भूमिका बजावली आहे. एक होतं पाणी, आव्हान, ही पोरगी कोणाची, लपून छपून यासारखे चित्रपट तसेच नकळत सारे घडले, कलर्स मराठीवरील श्री लक्ष्मीनारायण मालिकेत समुद्रदेव , ईटीव्ही वरील विवाहबंधन अशा मालिकांमधून तो झळकला आहे. रणजीतने अभिनयासोबतच ‘निताशा फिल्म्स इंटरनॅशनल’ ही निर्मिती संस्था उभारली आहे. रामायण मालिकेमुळे संजय जोग यांची आठवण होणे साहजिकच नाही का…
