रेल्वेस्टेशनवर गाणी गाऊन रातोरात स्टार बनलेल्या राणू मंडल आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागल्या आहेत. मध्यंतरी हिमेश रेशमिया यांनी दिलेली संधी पुरेशी नसल्याने राणू मंडल यांच्यावर पुन्हा एकदा स्टेशनवरच गाणे गायची वेळ आली होती. स्वतः लता मंगेशकर यांनीही त्यांच्याबाबत हेच भाकीत केलेले पाहायला मिळाले होते. अमाप प्रसिद्धी मिळूनही राणू मंडल पूर्वी होत्या त्याच परिस्थिला तोंड देताना दिसल्या. याच अनुषंगाने राणू मंडल यांच्याकडे पुन्हा अशीच एक नामी संधी चालून आलेली पाहायला मिळत आहे.

आकाश नायक दिग्दर्शित “सरोजिनी” या आगामी बॉलीवुड चित्रपटात राणू मंडल यांना पुन्हा एकदा गायची संधी मिळणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात सरोजिनी हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे बोलले जाते. सरोजिनी नायडू यांच्या बायोपिकवर हा चित्रपट साकारला जात आहे. सरोजिनी नायडू यांची भूमिका रामायण मालिकेतील सीता म्हणजेच अभिनेत्री “दीपिका चिखलिया” साकारणार आहेत. स्वतः दीपिका चिखलिया यांनीच सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर करत राणू मंडल सरोजिनी चित्रपटासाठी गाणं गाणार आहेत असे जाहीर केले आहे. त्यांच्या या बातमीने राणू मंडल यांना पुन्हा एकदा लॉटरी लागणार असेही बोलले जाते. अर्थात ही घोषणा केल्यावर राणू मंडल यांच्या डोक्यात पुन्हा एकदा हवा शिरू नये… त्यांनी त्यांचे पाय जमिनीवरच ठेवावेत असेही बोलले जात आहे…गेल्या वेळी मीडियाशी बोलताना किंवा चाहते भेटायला आल्यावर त्यांना दिलेली वागणूक जनतेने पाहिली आहे. एकदा डोक्यात शिरलेली हवा कशी बाहेर काढायची हे जनतेने त्यांना दाखवून दिले होते तशी वेळ त्यांनी स्वतःवरच ओढवून घेतल्याने त्या पुन्हा एकदा स्टेशनवर गाताना दिसल्या. आता मिळालेल्या या नव्या संधीचा त्या कसा फायदा करून घेतात हे येणारा काळच ठरवेल…