येऊ कशी तशी मी नांदायला ही झी मराठी वरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका काही कारणास्तव प्रेक्षकांनी नाकारलेली पाहायला मिळते आहे. स्वीटू आणि ओंकारची प्रेमकथा या मालिकेमधून रंगवताना लेखकाने गरीब आणि श्रीमंतीची दरी कमी केलेली दिसून येते परंतु त्याच बाजूला श्रीमंतीचा माज असलेली मालविका प्रेक्षकांना खटकलेली पाहायला मिळते. मालिकेतील ओंकारची बहीण अर्थात मालविकाची भूमिका अभिनेत्री अदिती सारंगधर यांनी चोख वठवली असली तरी लेखकाला यातून नेमके काय साध्य करायचे आहे हा प्रश्न उपस्थित राहतो.

नुकतेच या मालिकेत रॉकीला आपल्या चुकीची शिक्षा म्हणून मालविकाने कुत्र्यासारखी वागणूक दिली असल्याची दृश्ये दर्शवली गेली. मुळात मालविकाच्या प्रत्येक वागण्यात श्रीमंतीचा थाट दर्शवलेला पाहायला मिळाला. गरिबाला अतिशय हीन समजणाऱ्या परिणामी रॉकीला त्याची शिक्षा देणाऱ्या या मालविकावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही काल्पनिक कथा असली तरीही किंवा त्याचा वास्तव जीवनाशी कुठला संबंध नसला तरी एक मनोरंजन आणि एक विरंगुळा म्हणून प्रेक्षक मालिकांना आपलेसे करत असतात परंतु त्यातून लेखक अशा हीन दर्जाच्या वागणुकींना आपल्या लेखणीतून दर्शवतो हे प्रेक्षकांना खटकल्याने त्यांच्या भावनांशी खेळले जात असल्याचा आरोप सध्या सोशल मीडियावर चांगलाच रंगलेला पाहायला मिळतो आहे. अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काल झालेल्या दृश्यावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांच्या या बाबींचाही विचार व्हावा अशीच एक माफक इच्छा मालिकेच्या लेखकाकडे करण्यात आली आहे. झी वाहिनीच्या मालिका प्रेक्षक नुसत्या पाहत नाहीत तर त्यात ते जगतात हेच ह्यावरून सिद्ध होताना दिसते.