टीआरपी म्हणजेच त्या मालिकेचे खरे यश असे म्हटले जाते. मुळात मालिकेचे कथानक कितीही उत्तम दर्जाचे असुदे किंवा त्यातील कलाकार हे किती ताकदीने आपली भूमिका अभिनयातून जिवंत करतात याला सध्याच्या घडीला कुठलेच महत्व नसते असे मत दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मांडले आहे. सोनी मराठी वाहिनीवर सावित्री ज्योती ही एक दर्जेदार कथानक असलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्यामुळे महेश टिळेकर यांनी एक पोस्ट शेअर करून मालिकेप्रति आपली भावना व्यक्त केली आहे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की…

याला जबाबदार कोण? ’सावित्री ज्योती’ ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत मराठी मालिका केवळ मालिकेला टी आर पी नाही म्हणून बंद होत आहे हे ऐकून नक्कीच मला दुःख झाले. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे कौतुक करावं तितकं कमीच आहे.पण मग चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर,कार्यावर आधारित मालिका पहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा? नवऱ्याची लफडी,सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींच्यावर कुरघोडी करणाऱ्या जावा,हे असं सगळं बटबटीत पहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. विनोदाच्या नावावर माकडचाळे करून नक्की विनोद कश्याला म्हणायचं असा प्रश्न पडावा पण बघणारे काहीही करून हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानून काम आणि पैसे मिळाले की त्यातच सुख मानणारे कलाकार .बरेचदा परिस्थितीमुळे अनेकांना हे करणं भाग पडतं पण काही रियालिटी शोमध्ये विनोदाचा दर्जा आणि आब राखून लोकांचे लाडके ठरलेले गुणी विनोदी कलाकारही आहेतच. अभिनयाची भूक असणारे ओमकार गोवर्धन, अश्विनी कासार सारखे कलाकार उत्तम अभिनय करूनही त्यांची मालिका फक्त प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असेल तर या कलाकारांना किती दुःख होत असेल,की जीव तोडून मेहनत घेऊन टी आर पी च्या धंदेवाईक स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही.
सावित्री ज्योती सारख्या उत्तम मालिका प्रेक्षकांच्या पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होते याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की आणखी कुणी?” महेश टिळेकर